मुंबई - दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आणि देशात सणासुणीच्या काळात घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव उद्धवस्त केला. यात मुंबईतील जान मोहम्मद याचा समावेश आहे. हे सर्व दाऊदच्या संपर्कात असल्याने एटीएसने त्यांच्या हस्तकांवर लक्ष ठेवले होते. याच प्रकरणात शुक्रवारी रात्री एटीएसने मुंबईच्या नागपाडा परिसरातून झाकीर हुसेन शेख याला अटक केली आहे. दिल्लीत अटक करण्यात आलेल्या मुंबईच्या जान मोहम्मदला हत्यार आणि स्फोटकांची डिलिव्हरी घेण्यास झाकीर याने सांगितले होते. जाकीरने नेमके कोणाच्या आदेशावरून हत्यारे आणि स्फोटकांची डिलिव्हरी घेण्यास सांगितले होते, याचा खुलासा आता एटीएसच्या चौकशीतून होण्याची शक्यता आहे.
अशी केली अटक -
जान मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई एटीएसकडून दाऊदच्या हस्तकांचा शोध घेतला जात होता. जान मोहम्मदला अटक केल्यानंतर एटीएस झाकीर हुसेन शेखच्या मागावर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी जाकीर शेख हा मुंब्रामध्ये सुरक्षित जागा शोधत होता. त्याने त्याच्या पत्नीला वांद्रे येथील एका नातेवाईकाकडे ठेवले होते. याची माहिती मिळताच एटीएसने झाकीरच्या पत्नीला त्याला फोन करायला सांगून त्याला एका ठिकाणी भेटायला बोलावले आणि त्याला ताब्यात घेतले. झाकीर हा अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. झाकीरचा भाऊ शाकीर शेख हा पाकिस्तानमध्ये असून तो अनिस इब्राहिमचा उजवा हात आहे.
बॉम्बस्फोट घडवण्याची तयारी -
मुंबईत १९९३ साली कुख्यात डॉन दादाऊ याने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. भारतात अशाच प्रकारचा हल्ला करण्याची तयारी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. यासाठी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले ओसामा आणि जीशान बॉम्बस्फोट घडवण्यासाठी लोकांना तयार करत होते. ज्यासाठी दोन ते अडीच किलो आरडीएक्स त्यांनी मिळवले होतं. तसेच मुंबईतील अनीस इब्राहिमचा जवळचा हस्तक जाम मोहम्मद शेख हा या दहशतवाद्यांना लागणाऱ्या पैशापासून ते इतर सर्व साहित्य पोहोचवत होता, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.
काय होता कट -
डॉन दाऊद इब्राहीम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणासुदीतीला घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावलेला आहे. पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील एक दहशतवादी जान मोहम्मद शेख मुंबईत वास्तव्याला असून त्याने मुंबईची रेकी केली होती. त्यामुळे एटीएसने त्यांच्या पत्नीसह मुलीला आणि रेल्वेचे तिकीट काढून देणारा असगर शेखला ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कोण आहे जान मोहम्मद -
धारावीच्या एमजी रोडवरील सोशल नगरात मदिना मश्जिदीच्या पाठीमागे गेल्या काही वर्षांपासून जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया राहत होता. हा काही वर्षांपासून मुंबईत टॅक्सी चालवत होता. अत्यंत चिंचोळ्या गल्लीत राहणार्या त्याच्या कुटुंबाचा अतिरेकी कारवायांशी संबंध अद्याप आढळला नसला तरी अत्यंत गुप्तपणे याच घरातून जान मोहम्मद शेख अतिरेक्यांसाठी स्लीपर सेल चालवत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अडरवर्ल्डशी आणि खास करून दाऊद टोळीशी त्याचा सतत संपर्क असे. अधूनमधून तो गावी जाण्याचा बहाणा करून गायब व्हायचा. तो धारावीत राहतो. त्या भागात त्याचा कुणालाही त्रास नसल्याने त्याच्यावर कधी कुणी संशय घेतला नाही. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर जान मोहम्मद शेख या संशयित दहशतवाद्याचे पितळ उघडे पडले आहे.
हेही वाचा - जान मोहम्मदचे डी गँगशी कनेक्शन, एटीएसची टीम करणार चौकशी; विनीत अग्रवाल यांनी दिली माहिती
हेही वाचा - LIVE : दिल्लीत पकडण्यात आलेला संशयित दहशतवादी जान मोहम्मद मुंबईचा रहिवासी
हेही वाचा - मुंबईत येथे राहातो संशयित दहशतवादी, शेजाऱ्यांचा बोलण्यास नकार