मुंबई - मुंबईतील तृतीयपंथीयांसाठी स्वच्छतागृह ( Toilet For LGBTQ ) उभी करणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख ( Minister Aslam Shaikh ) यांनी दिली. तृतीय पंथीयांसंदर्भातील विविध समस्या सोडवण्यासाठी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. तसेच तृतीयपंथीयांचा समाजात एक विशिष्ट वर्ग आहे. तृतीयपंथीयांनाही सन्मानाने जीवन जगण्याचा, तसेच स्वत:ची प्रगती करण्याचा अधिकार असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगीतले.
तृतीयपंथी स्वयं विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन -
महिला कॉंग्रेस तृतीयपंथी सेलच्या माध्यमातून मालाड, मालवणीतील रमजानअली शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या विशेष चर्चासत्र व स्वयं विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तृतीयपंथीयांना गेल्या अनेक वर्षापासून उपेक्षित आणि वंचित जीवन जगावे लागत असून त्यांना मूलभूत मानवी हक्क मिळविण्यासाठी देखील झगडावे लागत आहे. ओळखपत्र, मालमत्ता हक्क, निवारा अशा अत्यावश्यक गरजांसाठीही त्यांना लढावे लागत आहे. वयोवृद्ध तृतीयपंथीयांची अवस्था तर फारच बिकट आहे. तृतीय पंथीयांच्या उन्नती व प्रगतीसाठी व त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे, मुख्य म्हणजे तृतीपंथीयांना शौचालयाची खूप मोठी अडचण येते. या वर्गासाठी विषेश शौचालये उभी करणार असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.