मुंबई- काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनामुळे एक कणखर व दूरदर्शी नेतृत्व हरपले, अशी भावना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
शीला दीक्षीत यांनी आपल्या १५ वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत दिल्लीचा चेहरामोहरा बदलून टाकला होता. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा व नागरी सुविधांची उभारणी करून त्यांनी दिल्लीचा संपूर्ण कायापालट केला, असे अशोक चव्हाण म्हणाले.
त्या विचारधारेशी एकनिष्ठ व खंबीर नेत्या होत्या. महिला अत्याचारांच्या विरोधातही त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्या अनुभवाची पक्षाला गरज असताना अकस्मात झालेले त्यांचे निधन धक्कादायक आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.