मुंबई - शिवसेना आणि भाजपामधील आरोप प्रत्यारोपाचा वाद आता राज्य महिला आयोगापर्यंत पोहचला आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरवर आक्षेपार्ह वक्तव्य ( Ashish Shelar's offensive statement against Mumbai mayor ) केले असून त्याची दखल महिला आयोगाने घेतली आहे. यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाला पाठवून देण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे दिले आहेत.
महापौरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य -
वरळी बीडीडी चाळ येथे मागील आठवड्यात मंगळवारी सिलेंडर स्फोट ( Worli Gas Cylinder Blast ) झाला होते. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. या घटनास्थळाला मुंबईच्या महापौर उशिरा भेट दिली होती. याबाबत टीका करताना मुंबईत झालेल्या सिलेंडर स्फोटानंतर 72 तासांनी महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे..... होतात असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी महापौर यांना केला होता. महापौरांवर टीका करताना आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याविरोधात महापौरांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

महिला आयोगाकडून दखल -
महापौरांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. महिला लोकप्रतिनिधी संदर्भात केलेली कोणतीही अवमानकारक वक्तव्य अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत. त्यामुळे राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाला पाठवून देण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
पोलिसात तक्रार -
तसेच या प्रकरणी मुंबई पोलीस मुख्यालयात शिवसेनेचे शिष्टमंडळ तक्रार दाखल करण्यासाठी आज विश्वास नांगरे पाटील यांची 3.30 वा भेट घेणार आहेत. यावेळी विशाखा राऊत, शिवसेना उपनेत्या आणि मुंबई महिला विभाग प्रमुख मीना कांबळी उपस्थित राहणार आहेत.