मुंबई : ड्रग्ज पार्टी प्रकरणी कारागृहात असलेल्या आर्यन खानविषयी दररोज नवी माहिती समोर येत आहे. न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्याने आर्यनचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. आर्यन कारागृहातील वेळ वाचनासाठी सदुपयोगात आणत असल्याची माहिती आता समोर येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून आर्यन राम आणि सीतेवर आधारित काही पुस्तकांचे वाचन करत असल्याची माहिती समोर येत आहे.
ही पुस्तके वाचत आहे आर्यन
कारागृह प्रशासनाच्या माहितीनुसार, जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन अतिशय तणावग्रस्त झाला. त्यानंतर इथल्या काही अधिकाऱ्यांनी त्याला पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला. त्याला कारागृहातील ग्रंथालयातून काही पुस्तकंही देण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून आर्यन राम आणि सीतेवर आधारित काही पुस्तकं वाचत आहे. याआधी त्यनं 'द लायन्स गेट' हे पुस्तकही वाचल्याची माहिती मिळाली आहे.
कैद्यांना पुस्तके वाचण्याची मुभा
कारागृह प्रशासनाच्या माहितीनुसार कोणत्याही कैद्याला हवे असल्यास आपल्या नातेवाईकांकडूनही आवडीची पुस्तके मागविता येतात.पण, इथं फक्त धार्मिक पुस्तकांनाच परवानगी आहे. कैदी कारागृहातून मोकळा होऊन बाहेर जात असताना त्यानं स्वेच्छेनं तिथे ठेवलेल्या पुस्तकांचा तेथील ग्रंथालयात समावेश करण्यात येतो.
तीन आठवड्यांनी दहा मिनिटांची भेट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधील कैद्यांना कुणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती. मात्र प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानला लेकाला भेटण्याची परवानगी मिळाली. गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाहरुख आर्थर रोड जेलमध्ये दाखल झाला. यावेळी जवळपास दहा मिनिटे दोघांमध्ये बोलणे झाले. बापलेकात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, वडिलांच्या भेटीनंतर आर्यनच्या काय भावना होत्या, याचा तपशील मिळालेला नाही. तसंच शाहरुखनेही भेटीनंतर कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलं.
हेही वाचा - अभिनेत्री अनन्या पांडेची आज पुन्हा एनसीबीकडून चौकशी