मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम रद्द केल्याचे धाडस केले, तो अनुभव आपण सर्वांनी घेतलाच आहे, अशी साहसी माणसेच वेगळा अनुभव घेत असतात. लोकांनी जंगलाच्या कथा सांगणे आणि जंगल अनुभवने वेगळे असते, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अवजड मंत्री अरविंद सावंत यांनी मोदी यांच्या डिस्कव्हरी चॅनेलवरील 'मॅन वर्सेस वाईल्ड शो' या कार्यक्रमावर व्यक्त केली.
डिस्कव्हरी चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड शो' या कार्यक्रमात बेयर ग्रील्स सोबत मोदी दिसले. याचे चित्रीकरण जिम कॉर्बेट नॅशनल पार्क येथे फेब्रुवारीमध्ये करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जगभरात १८० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमात मोदी हे पर्यावरण आणि वन्यजीव यांच्याप्रती जनजागृती करताना दिसले.
मोदी यांच्या साहसाची सावंत यांनी उघडपणे कौतुक करत त्यांच्या साहसाची तुलना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फोटोग्राफीशी केली. उद्धव यांनी हेलिकॉप्टरमधून दरवाजा उघडा असताना केलेली फोटोग्राफी छातीत धडकी भरवणारी आहे. वाघ समोर शिकार करत असताना फोटो काढणे ही छोटी गोष्ट नाही. म्हणूनच तर ही मोठी माणसे पुढे जातात, असे सावंत म्हणाले.