मुंबई - "संजय निरुपम हा आमच्यासाठी अदखलपात्र आहे. त्याचा पक्षच त्याची दखल घेत नाही, तर आम्ही त्या निरुपमची दखल का घ्यायची?" अशा शब्दांत शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत यांनी संजय निरुपम यांनी मातोश्री-2 वर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिवसेनापक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वांद्रे कलानगर येथील मातोश्री या निवासस्थानासमोर मातोश्री-2 निवासस्थानाचे बांधकाम सुरू आहे. ज्या जमिनीवर हे बांधकाम सुरू आहे, त्या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी निरुपम यांनी केली आहे. त्यावर शिवसेनेकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आली नाही, तरी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी निरुपम यांची दखल घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
"निरुपम यांची भाषा निंदयनीय आहे. वाईट एकाच गोष्टीचे वाटते, की ज्या मातोश्रीने त्याला खासदार केले त्यावर तो आरोप करत आहे. खाल्ल्या मिठाला तरी जागा जरा" अशा शब्दांमध्ये सावंत यांनी निरुपम यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काय आहे निरुपम यांचे आरोप..?
कलानगर येथील मातोश्री-2 या निवासस्थानाच्या बांधकामासाठी ठाकरे यांनी 2016 साली इंस्टोलिंग बायोटेक कंपनीचे संचालक राजभूषण दीक्षित यांच्याकडून 5.80 कोटी रुपयांना जमीन विकत घेतली होती. मात्र, या व्यवहारात घोळ असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे. वांद्रे येथील मोक्याच्या जागेवर इतक्या कमी किमतीत ही जमीन मिळणे शक्य नाही. जमिनीची किंमत कमी करून सांगण्यात आली आहे. तसेच, ज्या दीक्षित यांच्याकडून ही जमीन विकत घेण्यात आली. त्या दीक्षित यांच्यावर मनी लॉंड्रिंग प्रकरणी सीबीआयने आरोपत्र दाखल केले आहे. त्यामुळे मातोश्री-2 साठी किती रोख पैसे दिले याची चौकशी करण्याची मागणी निरुपम यांनी केली आहे.
हेही वाचा : राज्यातील पुरुष रुग्ण ठरत आहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी...