मुंबई - कोविड टेस्ट करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पहिल्या पॅथॉलॉजी लॅबच उद्घाटन नुकतंच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून कोविड टास्क फोर्समधील काही मान्यवर डॉक्टरांनी कोविड चाचणीसह उपचारासाठी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करता येऊ शकतो का? याची चाचपणी करायची विनंती राज्य शासनाला केली होती. त्यादिशेने टाकलेले हे एक सकारात्मक पाऊल आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.
मुंबईतील मिरारोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयाने ही पॅथॉलॉजी लॅब सूरु केली असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते नूकतच या लॅबच ई-उद्घाटन करण्यात आलं. यावेळी या रुग्णालयाचे संचालक डॉ. अजय संख्ये, चेअरमन आणि विषवस्त हृषीकेश मफतलाल, रुग्णालयाच्या सीएसआर विभागाचे प्रमुख डॉ. व्यंकट, गोवर्धन इको व्हिलेज प्रकल्पाचे सीईओ यचनीत पुष्करणा हे देखील उपस्थित होते.
या पॅथॉलॉजी लॅबला आयसीएमआर कडून कोविड-19 चाचणी घेण्याची परवानगी मिळाली असून, चाचणी घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केल्याने कमी वेळात जास्तीत जास्त लोकांच्या कोविड चाचण्या घेता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे त्याचा उपयोग चाचणीचे निदान लवकर होण्यासाठी होईल, हे वेगळं सांगायला नको. ठाणे जिल्ह्यात सुरू होणारी ही अशी पहिलीच लॅब असून तिचा फायदा ठाणे, मीरा भाईंदर, पालघर येथील रुग्णांना होऊ शकेल. सुरुवातीला दररोज 500 कोविड चाचण्या घेण्यात येत आहेत. ही संख्या 1000 रुग्णापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट लॅबने डोळ्यापुढे ठेवले आहे.
एकीकडे जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेली कोविड रुग्णाची संख्या पाहता, या रुग्णांची तातडीने चाचणी होणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोविड सारख्या आजारात रुग्णांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळेच रुग्णाशी कमीत कमी संपर्क येत आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून त्याची चाचणी करणे आणि कमी वेळात त्याच अचूक निदान करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आता सरकारी साधनासोबतच भक्ती वेदांत यासारख्या खासगी पॅथॉलॉजीकल लॅबचं सहाय्य मिळत असल्याने कोविड विरोधातील लढ्यात त्याचा निश्चित फायदा होईल यात काहीही शंका नाही.