मुंबई - जोगेश्वरी विधानसभा विधानसभा क्षेत्रातील मजास बस डेपोला लवकरच १०० मिनी बसेसचे आगमन होणार असल्याची माहिती बेस्टचे वाहतूक अधिकारी (नियोजन) प्रवीण शेट्टी यांनी आमदार रवींद्र वायकर यांना बैठकीत दिली. यावेळी नवे मार्ग लवकर सुरू करावेत, अशी मागणी वायकर यांनी बेस्ट अधिकाऱ्यांकडे केली.
'हे मार्ग सुरू करा'
विधानसभा क्षेत्रातील बेस्ट प्रवाशांच्या अनेक समस्या होत्या. अनेक नवीन मार्ग सुरू करण्याची विनंती बस प्रवाशांकडून करण्यात येत होते. बेस्ट प्रवाशांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना दिलासा देण्यासाठी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या बेस्टच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेतली होती. या बैठकीत बेस्ट प्रवाशांनी मजास आगार ते अंधेरी (पूर्व) मार्गावरील ४४१च्या कमी करण्यात आलेल्या फेऱ्यांमुळे प्रवाशांना होणार्या त्रासातून सुटका करण्यासाठी या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी, मजास आगार ते जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्ता मार्गे (पूर्व) स्थानक असा बसमार्ग तसेच जोगेश्वरी (पूर्व) ते अंधेरी स्थानक (पूर्व) असा नवीन बस मार्ग सुरू करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
दर्जेदार सेवा देण्यावर भर
मजास आगार व्हाया जोगेश्वरी स्थानक सत्यम इंडस्ट्री सुभाषनगर मार्गे विक्रोळी या मार्गाचे वर्तुळाकार प्रवर्तन करणे, जोगेश्वरी (पूर्व) ते मंत्रालयपर्यंत नवीन बस मार्ग सुरू करावा, प्रवाशांच्या सोयीसाठी सी-१५चे प्रवर्तन मजास आगार ते वरळी असे करण्यात यावे, सद्भक्ती मंदीर ते सिप्झ असा नवीन बसमार्ग सुरू करण्यात यावा, अशी सूचना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच बेस्ट प्रवाशांनी केली. तर बेस्टच्या बस व कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे बेस्ट प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यामध्ये अडचणी येत असल्याची माहिती वाहतूक विभागाचे अधिकारी शेट्टी यांनी आमदार वायकर यांना दिली.
'नवे मार्ग लवकर सुरू करा'
मजास बेस्ट डेपोमध्ये लवकरच १०० मिनी बसेस येणार असल्याने येथील प्रवाशांचे प्रलंबित प्रश्न निश्चित मार्गी लागतील तसेच नवीन बस मार्गही सुरू करणे शक्य होणार असल्याची माहिती, वायकर यांनी उपस्थितांना दिली. पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने नवीन बस घेताना इलेक्ट्रीकवर चालणार्या बसेस खरेदी करण्यावर भर द्यावा, अशी सूचनाही वायकर यांनी बेस्टच्या अधिकार्यांना केली. नवीन बसेस आल्यावर नव्याने सुरू करावयाचे मार्ग तत्काळ सुरू करून बेस्ट प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी सूचना वायकर यांनी बेस्टच्या अधिकार्यांना केली.