मुंबई : एकनाथ शिंदे गटातील ( Eknath Shinde Group ) आमदार उदय सामंत यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी सहा शिवसैनिकांना अटक केली. मात्र, पोलिसांकडून कोणतीही चौकशी न करता, कोणतेही सबळ पुरावे नसताना शिवसैनिकांना अटक केली जात असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेना खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, आमदार सचिन अहिर, शिवसेना खासदार सुनील राऊत आणि शिवसेना आमदार मनीषा कायंदे ( Shiv Sena MLA Manisha Kayande ) यांनी आज राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेऊन या घटनेत लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
पुण्यात शिवसैनिकांकडून बंडखोरांवर हल्ला : राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी 307, 323 सारख्या गंभीर कलम कोणतीही चौकशी न करता लावले असल्याचे पोलीस महासंचालकांना म्हटले आहे. केवळ पुण्यात नाही. तर माथेरान, सांगली आणि संभाजीनगर अशा या राज्यांतील अनेक ठिकाणी शिवसैनिकांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याचेही शिवसेना नेत्यांनी महासंचालकांच्या निदर्शनास आणून दिले.
उद्धव ठाकरेंनी केले आवाहन : बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक होऊ नये. त्यांना त्यांचा आनंद लुटू द्या, असे उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात कोणतेही पाऊल उचललेले नाही. मात्र, पुण्यात आमदार उदय सामंत यांनी जाणून-बुजून शेवटच्या क्षणी आपला मार्ग बदलला असल्याचा आरोप शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केला आहे. पोलीस महासंचालकांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. तसेच, या भेटीदरम्यान पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचेही मनीषा कायंदे यांनी सांगितले.
प्रभागरचनेचा निर्णय मंत्री म्हणून एकदाच शिंदे यांनी घेतला : राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री होते. मुंबईच्या आणि इतर महानगरपालिकेच्या प्रभागरचनेबाबत त्यांनीच निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या पाठिंबावर मुख्यमंत्री त्यांनी आपलाच निर्णय बदलला. त्यामुळे प्रभागरचना बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाच्या दबावाखाली घेतला आहे स्पष्ट होते आहे, असा टोला मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी लगावला.