मुंबई - शहरातील बेस्ट बस प्रशासनाने आपत्कालिन आणि अत्यावश्यक सेवेत रुजू असणाऱ्या कामगारांना ने-आण करण्यासाठी बससेवा सुरू ठेवली आहे. मात्र, शहरात आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. याच पार्श्वभूमीवर बेस्टने बसमधून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी एक नवीन शक्कल लढवली आहे. बेस्टकडून आता बस ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर पारदर्शक सुरक्षा कवच काचेची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा... मुंबईत नवीन 692 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 11 हजारांच्या वर
मुंबई बेस्ट बस सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आतापर्यंत बेस्टच्या तीन कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पारदर्शक सुरक्षा काचेमुळे बेस्टच्या ड्रायव्हरला अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने आण करताना कोरोना विषाणुचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली आहे. बसमधील या नवीन बदलाचे बस चालकांनी स्वागत केले आहे.