मुंबई - मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ( BMC Election 2022 ) मार्च महिन्यात होणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील वाढलेली लोकसंख्या लक्षात घेत राज्य सरकारने ९ प्रभागाची वाढ केल्याने मुंबईमधील प्रभागांची संख्या २३६ झाली आहे. या २३६ प्रभागांच्या रचनेस राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) मान्यता दिली आहे. तसेच प्रभागाच्या सीमा जाहीर करून हरकती व सूचना मागण्यासाठी निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. यामुळे आता लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार हे स्पष्ट झाले आहे.
प्रभाग पुनर्रचनेला निवडणूक आयोगाची मान्यता - मुंबई महानगरपालिकेत २२७ प्रभाग आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाढल्याने राज्य सरकारने ९ प्रभाग वाढवले आहेत. यामुळे मुंबई महापालिकेत आता २३६ प्रभाग झाले आहेत. २२७ वरून २३६ प्रभाग करण्याला भाजपने विरोध केला होता. त्यासाठी भाजप उच्च न्यायालयात गेली असता न्यायालयाने भाजपची याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यानंतर २३६ प्रभागांचा प्रभाग पुनरर्चना अहवाल मुंबई महापालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. हा अहवाल निवडणूक आयोगाने मान्य केला आहे. २३६ प्रभागाच्या सीमा ठरवून त्याबाबत सूचना व हरकती मागवाव्यात व त्याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा, असे पत्र निवडणूक आयोगाने पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना पाठवले ( BMC Commissioner ) आहे.
हरकती व सूचना मागवण्याचा कार्यक्रम - निवडणूक आयोगाने प्रभाग पुनर्रचनेवर हरकती व सूचना मागविणे व त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रम आखून दिला आहे. त्यानुसार 1 फेब्रुवारीला निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे. 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान प्रारूप अधीसूचनेवर हरकती व सूचना मागवणे, 16 फेब्रुवारीला प्राप्त झालेला हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे. 26 फेब्रुवारीला राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनासंदर्भात सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. 2 मार्चला सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकारी यांनी केलेल्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पालिका आयुक्तांना केल्या आहेत.
या विभागात वाढतील प्रभाग - २०११ च्या लोकसंख्येच्या आधारापेक्षा गेल्या ११ वर्षांच्या काळात वाढलेल्या नव्या इमारती, वस्त्या आणि वाढीव नवी बांधकामे झालेल्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या घनतेचा आधार घेऊन वॉर्ड पुर्नरचना करण्यात आली आहे. मुंबईमधील २२७ प्रभागांच्या संख्येत ९ ने वाढ होऊन प्रभागांची संख्या २३६ इतकी झाली आहे. मुंबई महापालिकेने वॉर्ड पुर्नरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर केला होता, त्याला मंजुरी मिळाली आहे. यानंतर सूचना व हरकती मागवल्या जातील आणि वॉर्ड पुर्नरचना अंतीम केली जाईल. मुंबई शहर ( Mumbai City ), पश्चिम उपनगरे ( Western Mumbai Suburbs ) आणि पूर्व उपनगर ( Eastern Mumbai Suburbs ) याठिकाणी प्रत्येकी ३ वॉर्ड वाढवले जाणार आहेत. शहरभागात लोअर परळ, वरळी सारख्या नवी बांधकामे आणि इमारती उभ्या राहिलेल्या परिसरात, पूर्व उपनगरांत मानखुर्द, संघर्षनगर, माहूल तर पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, वांद्रे या भागात नवे वॉर्ड असतील.
असे असेल मुंबई महापालिका निवडणुकीतील आरक्षण ( Reservation in BMC Election )- मुंबई महापालिकेत २३६ प्रभाग झाले असून त्यामधील एकूण २०१९ प्रभाग ओपन म्हणजेत खुल्या प्रगवर्गात असणार आहेत. १५ प्रभाग एससी म्हणजेच अनुसूचित जातीसाठी तर २ प्रभाग एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहेत. एकूण २३६ पैकी ५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने महिलांसाठी ११८ प्रभाग राखीव असतील, त्यामधील एससी महिलासाठी ८ तर एसटी महिलांसाठी १ प्रभाग राखीव असणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसीं आरक्षित जागा या खुल्या प्रवर्गासाठी ग्राह्य धरल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
हरकती व सूचना मागविणे असा असेल कार्यक्रम -
- 1 फेब्रुवारी - निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्र पत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे.
- 1 ते 14 फेब्रुवारी - प्रारूप आधी सूचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी असणार आहे.
- 16 फेब्रुवारी - प्राप्त झालेला हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे.
- 26 फेब्रुवारी - राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनासंदर्भात सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक असणार आहे.
- 2 मार्च - सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवणे.
मुंबईत महापालिका एकूण वॉर्ड 236
- खुला प्रवर्ग - 219
- अनुसूचित जाती - 15
- अनुसूचित जमाती - 2
- महिलांसाठी राखीव
- एकूण - 118
- अनुसूचित जाती - 8
- अनुसूचित जमाती - 1
हेही वाचा - BMC ELection : मुंबई महापालिकेचे यंदाचे इलेक्शन बजेट, 'या' तारखेला होणार सादर