मुंबई - तौक्ते चक्रीवादळादरम्यान मुंबईमधील तब्बल दोन हजारांवर झाडे आणि फांद्या कोसळल्या होत्या. ही झाडे आणि फांद्या अद्यापही अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच पडून आहेत. आता तब्बल आठवडाभरानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. मृत अवस्थेत असलेल्या धोकादायक झाडांची छाटणी करण्याचा प्रस्ताव तीन महिन्यांपासून रखडला होता. अखेर आज वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
दरवर्षी मुसळधार पावसात मुंबईच्या विविध भागात झाडे व फांद्या कोसळण्याचे प्रकार घडतात. या अपघातात अनेकवेळा नागरिक जखमी व मृत्यूच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसापूर्वी मुंबईतील मृत अवस्थेत असलेल्या धोकादायक झांडांची छाटणी केली जाते. यंदा मार्च महिन्यात अशी झाडे छाटणीचा प्रस्ताव प्रशासनाने आणला. मात्र तो मंजुरीशिवाय रखडवून ठेवण्यात आला. यासाठी एक वर्षांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव होता. मात्र तीन महिन्यांपासून हा प्रस्ताव मंजुरीशिवाय रखडवून ठेवण्यात आला. तौक्ते वादळात मुंबईत शेकडो झाडे उन्मळून पडली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची देखील घटना घडली. मात्र तरी देखील वृक्ष छाटणीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नव्हती. यावरून भाजपाने आंदोलनाचा देखील इशारा दिला होता. अखेर तीन महिन्यांनंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
झाडांची छाटणी योग्य प्रकारे होणार का ?
मृत झाडांचे सर्वेक्षण करून झाडे तोडणे व त्यांची विल्टेवाट लावणे तसेच अनावश्यक फांद्यांची छाटणी करणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, झाडांच्या बुंध्यांशी चुना व गेरूचा गिलावा देणे यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती बाबतचे तीन प्रस्ताव मार्च महिन्यात मंजुरीसाठी आले होते. या प्रस्तावाची मुदत येत्या ३ जून रोजी संपणार होती. वृक्ष प्राधिकरण कायद्यानुसार समितीची बैठक दर २१ दिवसांनी होणे बंधनकारक आहे, असे असताना २३ मार्च २०२१ पासून ६० दिवसांत वृक्ष प्राधिकरणाची एकही बैठक झाली नाही. पावसाळा डोक्यावर आला असताना हा प्रस्ताव तीन महिन्यांनंतर मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पावसापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी योग्य प्रकारे होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
'झाडे कोसळण्याला सत्ताधारी जबाबदार'
तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने शेकडो झाडे कोसळली. यानंतर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा भाजपाने दिल्यानंतर, खडबडून जागे होत सत्ताधारी आणि प्रशासनाने सोमवारी वृक्ष प्राधिकरणाची बैठक बोलावली. या बैठकीत वृक्ष छाटणीचा प्रस्ताव तातडीने मंजूर केला. प्रस्ताव रखडल्याने तौक्ते वादळात अनेक झाडे उन्मळून कोसळली. मुंबई शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या ८१५ प्राचीन वृक्षांचा वध झाला. याला संपूर्णतः सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार असल्याची टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
हेही वाचा - सोलापूर : सांगोला तालुक्यात अनैतिक संबंधातून पत्नीने काढला पतीचा काटा