मुंबई - मुंबईतील पहिला 'क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प' अत्यंत गजबजलेल्या अशा भेंडीबाजारमध्ये राबविण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेकडून छोट्या आकाराचे २३ भूखंड विकासक 'सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट'ने मागितले आहेत. त्या बदल्यात ट्रस्ट पालिकेला २ मोठे भूखंड आणि ११ कोटी रुपये देणार आहे. मात्र हा सौदा पालिकेसाठी अत्यंत तोट्याचा असल्याने त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे.
भेंडीबाजार येथील दाटीवाटीच्या जागेतील जुन्या इमारतींचा आणि चाळींचा विकास करण्यासाठी सरकारने क्लस्टर डेव्हलपमेंट योजना पुढे आणली. या प्रकल्पासाठी "सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट"तर्फे विकास करणार आहे. या ट्रस्टला क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी पालिकेच्या २३ छोट्या भूखंडांची आवश्यकता आहे. विकासकाने पालिकेकडून मोक्याचे भूखंड मागितले आहेत. या २३ भूखंडावर १५० भाडेकरू आहेत. त्याबदल्यात विकासक पालिकेला दोन भूखंड देणार आहे. त्यावर ४५० भाडेकरू आहेत. पालिकेला या ४५० भाडेकरूंची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. तसेच विकासक पालिकेला फक्त ११ कोटी रुपये देणार आहे.
विकासक पालिकेकडून जे भूखंड घेणार आहे त्यावर किती इमारती बांधल्या जाणार आहेत, त्यामधील किती फ्लॅट विकले जाणार आहेत. तसेच ट्रस्ट पालिकेला जे भूखंड देणार आहेत त्यावर किती इमारती व फ्लॅट उपलब्ध होतील याची माहिती दिली नसल्याने या प्रस्तावाला काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी विरोध केला. भाजपच्या नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी, पालिकेने केवळ ११ कोटी रुपये न घेता मार्केट रेट व रेडीरेकनर रेटप्रमाणे किंमत तपासून जी किंमत जास्त वाटते त्याप्रमाणे जास्तीची रक्कम घ्यावी, अशी सूचना केली. तसेच त्या ट्रस्टने शाळेच्या जागेवरच शाळा बांधून द्यावी इतरत्र बांधू नये, अशी मागणीही केली.
भाजपचे अभिजित सामंत यांनी ही पालिकेसाठी तोट्याचा व्यवहार असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पामुळे तेथील जागेला सोन्याचे दर येणार आहेत. त्यामुळे पालिकेने त्यानुसार जास्त किंमत घ्यावी अशी मागणी सामंत यांनी केली. भाजपच्या शीतल गंभीर यांनी मूल्यमापन पुन्हा करावे, अशी मागणी केली. यावर सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी हा प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवण्याचे आदेश दिले.