मुंबई- अँटिलिया इमारतीच्या बाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. याबाबत मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. 'एनआयए'कडून त्यांची चौकशी सुरू आहे. आज सचिन वाझेंना घेऊन 'एनआयए'चे पथक अँटिलिया इमारतीच्या परिसरात पोहोचले. त्यांना यावेळी अँटिलिया इमार, माहीम व बीकेसी अशा ठिकाणी नेण्यात आले. दरम्यान यावेळी राष्ट्रीय तपास पथकाकडून सचिन वाझे यांना जा जागेसंदर्भात प्रश्न देखील विचारण्यात आले. यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझे यांना ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
'पीपीई किटमधील ती व्यक्ती सचिन वाझेच'
दरम्यान मुकेश अंबानींच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीच्या रात्री पीपीई किटमध्ये दिसलेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. जी स्कॉर्पिओ गाडी अँटिलिया इमारतीच्या बाहेर काही अंतरावर पार्क करण्यात आली होती, त्या मागे असलेल्या इनोव्हा कारचा चालक दुसरा कोणी नसून स्वतः सचिन वाझे असल्याचा दावा एनआयएच्या सूत्रांनी केलेला आहे.
हेही वाचा - पोलीस दलातील घडामोडींवर संजय राऊतांचे ट्विट, म्हणाले..