मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेमधील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला. त्यावर आज अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
दुध का दुध, पानी का पानी करावं
अनिल देशमुख यांनी पत्रात म्हटलंय की, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना 17 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप केलेत, त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे त्यांनी जे आरोप लावले आहेत, या संपूर्ण प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दुधका दुध, पानीका पानी करावं अशी मागणी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
परमबीरही न्यायालयात
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला. याचिकेत परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून करण्यात आलेली बदली ही चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच याचिकेमध्ये सीबीआयची चौकशीची मागणी करण्यात आली होती. तब्बल 130 पानांच्या याचिकेमध्ये परमबीर सिंग यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचा दाखला दिला होता.