मुंबई - आयआयटी मुंबईच्या एका प्राध्यापकाने कोरोना विषाणूच्या जलद आणि स्वस्त तापसणीसाठी एक अत्याधुनिक टेस्टिंग टूल-टेपेस्ट्री तयार केली आहे. यामुळे कोविड चाचणीला लागणाऱ्या खर्चात 50 ते 85 टक्के कमी होणार आहे. त्यामुळे, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, या कोरोना टेस्टिंग टूल-टेपेस्ट्रीला भारतीय औषध महानियंत्रक संस्थेकडून मान्यतासुद्धा देण्यात आली आहे.
हेही वाचा - मुंबईतील परिचारिकांच्या लढ्याला यश; 100 टक्के मागण्या मान्य
11 वर्षानंतर आले यश -
सर्वात स्वस्त आणि जलद पद्धतीने कोरोना विषाणूचे निदान करण्यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या एका प्राध्यापकाने टेस्टिंग टूल-टेपेस्ट्री
विकसित केली आहे. आता टेस्टिंग टूल-टेपेस्ट्री लवकरच बाजारात येणार आहे. ही टेस्टिंग टूल तयार करणाऱ्या प्राध्यापकाचे नाव मनोज गोपालकृष्णन असून मुंबई आयआयटीच्या इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग विभागामध्ये ते प्राध्यापक आहेत. 2009 मध्ये जेव्हा संपूर्ण देशात संसर्गजन्य असलेली स्वाईन फ्लू ही माहामारी आली होती. तेव्हा प्राध्यापक मनोज गोपाळकृष्णन यांनी या संसर्गजन्य विषाणूचे नमुने जमा करण्याकरिता आणि विषाणूला रोखण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावर ते अभ्यास सुद्धा करत होते. मात्र, प्रत्यक्षात तो प्रयत्न तसाच राहिला. गेल्या वर्षीपासून कोरोनाची महामारी आली. तब्बल अकरा वर्षांनंतर पुन्हा एकदा या विषाणूचा शोध लावण्यासाठी प्राध्यापक मनोज गोपाळकृष्णन कामाला लागले.
खर्च आणि वेळेची होणार बचत -
प्राध्यापक मनोज गोपालकृष्णन यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या कोविड चाचण्या करणे आवश्यक आहे. मात्र, कोरोना चाचणीचा खर्च जास्त असल्यामुळे अनेक नागरिक चाचणी करत नाही. त्यामुळे, कोरोना चाचणीचा खर्च कमी करण्यासाठी दहा मित्रांच्या मदतीने दोन महिन्यांत एक टेस्टिंग टूल-टेपेस्ट्री तयार करण्यात आली. टेपेस्ट्री ही एक सिंगल राउंड मात्रात्मक पुलिंग एल्गोरिथम आहे. जी आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येत आहे. मात्र, टेपेस्ट्रीची मात्रा कमी केल्यावर कोरोना चाचणीची किंमत 50-85 टक्के कमी होणार आहे. तसेच, वेळेची मोठी बचत होणार आहे. या आठवड्यातच टेस्टिंग टूल-टेपेस्ट्रीला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) नॉन-रेग्युलेटेड मेडिकल डिव्हाईस म्हणून मान्यता दिली आहे.
मुंबईत शुक्रवारी 693 नव्या रुग्णांची भर, 20 मृत्यूची नोंद
दरम्यान, शुक्रवारी (दि. 25 जून) मुंबईत 693 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 20 मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 713 दिवसांवर पोहचला आहे.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 713 दिवसांवर
मुंबईत शुक्रवारी 693 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 20 हजार 339 वर पोहचला आहे. शुक्रवारी 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 315 वर पोहचला आहे. शुक्रवारी 575 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 92 हजार 245 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 10 हजार 437 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 713 दिवस इतका आहे.
हेही वाचा - अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर राहणार नाही; वकिलाची माहिती