मुंबई - 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये १०५ आमदारांना बेकार करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर ट्विटरवरून पलटवार केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात अजित पवारांवर टीका केली होती. पुणे मनपासाठी अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर त्यासाठी ऊर्जा वाया घालू नये, आम्ही पण तुमचे बाप आहोत, असे आक्षेपार्ह विधान चंद्रकांत पाटलांनी केले होते. या विधानावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांविरोधात एक ट्वीट करून तुमचे बाप कोण आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, "काय तर म्हणे आम्ही तुमचे बाप आहोत 2019 विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. 2022 साली पुणे मनपात पुण्याची जनता अजितदादा पवार हेच तुमचे बाप आहोत हे सिद्ध करून दाखवेल" असे मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच पुढे मिटकरी यांनी "पुणेकर जागरूक व तितकेच दक्ष असतात, हा आजवरचा इतिहास आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला पुणेकर त्यांचा बाप दाखवून देतील. त्यामुळे पुणे तिथे काय उणे ?? "असेही म्हटले आहे. मिटकरी यांच्या ट्विटमुळे पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी सुरूच राहणार असल्याचे दिसून येते.