मुंबई - शहरात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. कोरोना विषाणू संदर्भात काम सुरू असताना पोलिओ लसीकरण व इतर कार्यक्रम आरोग्य सेविकांना द्या, अशी मागणी केली जात होती. अशा परिस्थितीतही २० सप्टेंबर रोजी पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत एकूण ५ लाख १२ हजार ८६० बालकांना पोलिओ लस देण्यात आल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. २५ सप्टेंबरपर्यंत घराघरात जाऊन बालकांना लस दिली जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात ४ हजार ७९७ ‘बुथ’चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी १३ हजार ९९२ कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये महापालिका कर्मचारी, आरोग्य स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता. ही मोहीम कोविडच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने मोहिमेत सहभागी होणाऱया सर्वांना बालकांना स्पर्श न करता लस पाजण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मास्क वापरणे, सॅनिटायझरचा योग्य वापर करणे आणि बुथवर एकावेळी कमीत-कमी व्यक्ती शारीरिक अंतर पाळण्यासह उपस्थित असतील या बाबींचीही काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्यात आली. या मोहिमेत एकूण ५ लाख १२ हजार ८६० बालकांना पोलिओ लस देण्यात आली.
पोलिओ निर्मुलनासाठी ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम’ सन १९९५ पासून दरवर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ लसीची अतिरिक्त मात्रा देण्यात येते. भारतात १३ फेब्रुवारी २०११ नंतर आजतायगत एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही. यामुळे भारताला मार्च २०१४ मध्ये ‘पोलिओमुक्त भारत’ असे प्रमाणपत्र प्राप्त झाले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, मोहिमेचा दुसरा टप्पा २५ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. २० सप्टेंबर रोजी पोलिओ लसीची मात्रा मिळाली नसेल, त्यांनी मोहिमेच्या दुसऱया टप्प्यात पोलिओ लसीची मात्रा मिळेल, याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आलेले आहे.