मुंबई - मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेऊन जगात विद्यापीठाचे नावलौकिक करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल म्हणून यावर्षी पासून हा पुरस्कार दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची सर्वाना ओळख होण्यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्यांचे वय हे ५० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा तीन माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आहे. क्यूएस ग्रॅज्युअट एम्प्लॉयबिलिटी रँकिंगनुसार मुंबई विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांची सर्वोतम कामगिरी करत असल्याचे पाहणीत उघड झाले आहे. त्यांच्या कामगिरीची नोंद घेत १०० पैकी ८७२ गुण विद्यापीठाला बहाल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - गणवेश आणि इतर शालेय साहित्यांसाठी विद्यार्थ्यांना 'तारीख पे तारीख'
देशाची ज्ञानविषयक गौरवशाली परंपरा आणि वाढता सामाजिक आर्थिक प्रभाव पाहता मुंबई विद्यापीठाने ज्ञानदानाच्या कार्यात आपला मोलाचा ठसा उमटवला आहे. येथील अनेक माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक,राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले आहे. समृद्ध राष्ट्राच्या उभारणीत या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणाऱ्या भारतरत्न पुरस्काराने येथील पाच माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनेक विद्यार्थ्यांना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहे. रॉयल फेलो ऑफ सोसायटी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे यावर्षी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.
हे ही वाचा - मुंबईत कोणाला किती जागा? आढावा...