मुंबई - पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. तर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची रेल्वे बोर्ड सदस्य, पायाभूत सुविधा या पदावर नवी दिल्ली येथे पदोन्नती झाली आहे.
आलोक कंसल हे भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवा (आयआरएसई) च्या 1983 च्या तुकडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. 14 जानेवारी 2020 पासून पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. कंसल यांनी रुडकी विद्यापीठातून सुवर्ण पदकासह सिव्हिल अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. त्यांनी त्याच संस्थेतून सुवर्ण पदकासह स्ट्रक्चरल अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदवी देखील प्राप्त केली आहे. त्यांना अतिवेगवान आणि आत्यंतिक घनता असलेल्या वाहतुकीच्या मार्गांच्या परिचालन आणि देखभालीचा 18 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. कंसल हे भारतीय रेल्वेच्या अति- वेगवान असलेल्या पहिल्या शताब्दी एक्स्प्रेस ट्रेनच्या सुरूवात करण्याशी संबंध असलेले पहिले सहाय्यक अभियांत्रिकी अधिकारी आहेत.
भारतीय रेल्वेतील सर्वात मोठा विभागीय रेल्वे असलेल्या दिल्ली विभागातील अभियांत्रिकी शाखेचे ते प्रमुख होते. त्यांनी बिलासपूर व उत्तर झोनमध्ये मुख्य ट्रॅक अभियंता म्हणूनही काम केले आहे. उत्तर रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वेच्या राजधानी मार्गांवरील पहिले वाहन युडीएफडीस अंतिम स्वरूप देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. निर्माण अभियंता म्हणून कार्यरत असताना कंसल यांनी सुवर्ण चतुर्भुज आणि पूर्व-मध्य रेल्वे (ईसीआर) वर गेज रूपांतरण, दुहेरी प्रकल्पांचे अनेक प्रकल्प राबविले आहेत. मुंबईतील ठाणे- खाडी पुलावरील सर्वात लांब (2 कि.मी.) पीएससी बॉक्स गर्डर ( 54.5 मीटर स्पॅन) त्यांच्याद्वारे कार्यान्वित करण्यात आला. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी रेल्वे बोर्डात प्रधान कार्यकारी संचालक / सिव्हिल इंजिनीअरिंग (नियोजन) म्हणून काम पाहिले आहे.