मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ची आज राज्यभरात परीक्षा होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठी उपनगरीय लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हॉल तिकिटावर मिळणार लोकलमध्ये प्रवेश -
भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासात मुभा द्यावी अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. राज्य सरकारने तसा प्रस्ताव रेल्वेला देणे गरजेचे आहे असे, रावसाहेब दानवे यांनी सांगितले. त्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य शासनाशी संपर्क करून लोकल प्रवासात विद्यार्थ्यांना मुभा द्यावी अशी विनंती केली. याची दखल घेत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी तसा प्रस्ताव रेल्वेला तातडीने पाठविला. त्यानुसार मध्य रेल्वेने एमपीएससीच्या परिक्षार्थ्यांना शनिवारी हाॅल तिकिट दाखवून लोकल प्रवास करण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा -
परिक्षाकेंद्रावर वेळेआधी पोहचणे महत्त्वाचे असते. बस, एसटी, खासगी गाडी किंवा टॅक्सीमधून प्रवास केल्यास वाहतूककोंडीचा अडथळा येऊ शकत होता. मात्र, आता लोकल प्रवास सुरू केल्याने परिक्षा केंद्रावर वेळेत आणि वेगात पोहचता येणार आहे. त्यामुळे आम्ही शासनाने आभार मानतो अशी प्रतिक्रिया एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी दिली.