मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित कार सापडली होती. त्या कारचा मालक मनसुख हिरेनचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन हा या प्रकरणात महत्वाचा पुरावा असून, त्याच्या जीवाला धोका असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपल्या भाषणात सांगितले आणि केवळ दीड तासानंतर त्या मनसुख हिरेनचा मृतदेह कळव्याच्या खाडीत सापडला. हा तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्या भूमिकेवर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
हा तपास एनआयएकडे द्या - फडणवीस
अंबानींच्या घराबाहेर पार्क केलेली गाडी ही चोरी झाल्याची तक्रार गाडीमालकाने केली होती. चोरीच्या प्रकरणात जबाब देताना त्यांनी एक टेलिफोन नंबर सांगितला होता. त्या नंबरचा एका विशिष्ट नंबरशी 8 जून 2020, 25 जुलै 2020 त्यानंतर अनेकवेळा बोलणे झाले होते. त्यातील एक नंबर वझे यांच्या नावावर आहे. ज्या दिवशी ही गाडी ठाण्याला बंद पडल्यानंतर गाडी मालक ओला घेऊन क्रॉफर्ड मार्केटला गेला, तिथे पोलीस आयुक्तांचे ऑफिस आहे. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण? याची चौकशी होणे गरजेचे आसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. या प्रकरणात योगायोगाने वझे हे ठाण्यात राहणारे आणि ज्याची गाडी घरासमोर पार्क केली तोही ठाण्यात राहणारा हे कसं? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यामुळे याचा तपास एनआयएकडे सोपवून सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच हे प्रकरण लवकरात लवकर एनआयएकडे देण्यासाठी केंद्र सरकारसोबतही बोलणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - LIVE : अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाचा मृतदेह सापडला
हेही वाचा - प्राप्तिकर विभागाची सलग तिसर्या दिवशी छापेमारी सुरू