मुंबई - एका कर्मचाऱ्याची बदली केल्याने सायन कोळीवाडा विभागात पालिका कर्मचाऱ्यांनी गेले १५ दिवस पाणी कपात केली आहे अशी तक्रार विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली होती. मात्र, ही पाणी कपात कर्मचाऱ्याची बदली केल्याने नव्हे तर त्या विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये गळती असल्याने झाल्याचे पालिका प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांना पाणी मिळत नसेल तर कमर्शियल लोकांना देण्यात येणारे पाणी तोडून नागरिकांना द्यावे असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
गळतीमुळे पाणी पुरवठ्यात अडथळे
मुंबईत ऐन दिवाळीच्या तोंडावर पाणी कपात केल्याने स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली होती. त्यावेळी एफ नॉर्थ विभागातील एका कर्मचाऱ्याला मलबार हिल येथे बदली करण्यात आले होते. त्या कर्मचाऱ्याला पुन्हा एफ नॉर्थ विभागात आणल्याने इतर कर्मचाऱ्यांनी विभागातील पाणी कापल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला होता. रवी राजा यांना इतर सर्वच पक्षांनी पाठिंबा दिल्याने मागील स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली. यावर आज पालिका प्रशासनाकडून उत्तर देण्यात आले. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आणि मुंबईमधील पाण्याचा साठा करणाऱ्या रिझर्व्ह वॉटर टँकमध्ये पाणी योग्य प्रमाणात असते. मात्र, पुढे पाण्याचे प्रमाण कमी होत जाते.
कर्मचाऱ्याच्या बदलीमुळे पाणी कपात झाले नाही
पाहणी केली असता रवी राजा यांच्या विभागात सहा ठिकाणी मोठ्या पाईपलाइनमध्ये पाण्याची गळती आढळून आली आहे. गळती दुरुस्त केली आहे. हे काम १५ दिवसांपूर्वी झाले आहे. यामुळे आता पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली. मुंबईमध्ये सर्व ठिकाणी पाण्याचे सामान वाटप झाले पाहिजे असे सांगत कर्मचाऱ्याच्या बदलीमुळे पाणी कपात झाले नसल्याचे वेलारासू यांनी सांगितले. पाईपलाईन दुरुस्ती आणि सक्शन टॅंक उभारणे अशी कामे करून पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल. ऑक्टोबर हिटमध्ये पाण्याची मागणी वाढते. त्यासाठी ज्या विभागात पाण्याची तक्रार आहे त्याची नोंद घेऊन त्या तक्रारी दूर कराव्यात अशा सूचना देण्यात आल्याचे वेलारासू यांनी संगितले.
कमर्शियल लोकांचे पाणी तोडा
यावर पालिका प्रशासने ६ ठिकाणी पाणी गळती आहे हे मेनी केले आहे. दुरुस्तीनंतर ५० ते ६० टक्के सुधारणा झाली आहे. तलाव आणि रिझर्व्ह वॉटर टॅंकमध्ये पाणी असते. त्यानंतर नागरिकापर्यंत पाणी पोहोचताना ते कमी होत जाते. २ ते ३ महिन्यात पालिकेची निवडणूक आली आहे. निवडणुकीमध्ये पाणी आणि रस्ते बघितले जातात. यामुळे त्याआधी पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. यावर पाणी पुरवठ्यात सुधारणा करावी. बैठकीत कोणाच्याही तिखट प्रतिक्रिया येता कामा नये असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव म्हणाले. भायखळा ई विभागात बोटींसाठी दिले जाणारे पाणी विकले जात आहे. याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे जाधव म्हणाले. मुंबईकर नागरिकांना पाणी मिळत नसले तर कमर्शियल लोकांना देण्यात येणारे पाणी तोडून नागरिकांना द्यावे असे निर्देश जाधव यांनी दिले.