मुंबई - मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांनी धुरा सांभाळल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस वारंवार समोर येत आहे. विशेष म्हणजे मुंबई काँग्रेस जाणून-बुजून उत्तर भारतीयांवर दुर्लक्ष करत आहे, असा थेट आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वबंधु राय यांनी केला आहे. याबाबत एक वर्षापूर्वी हायकमांड सोनिया गांधी यांना सुद्धा राय यांनी पत्र दिलं होत. तर दुसरीकडे विश्वबंधु राय हे जाणून बुजून या सर्व गोष्टी करत आहे व या कारणास्तव काँग्रेसची बदनामी होत आहे, त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं, असं सांगत मुंबई काँग्रेसतर्फे विश्वबंधु राय यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
राय यांचे स्पष्टीकरण -
मी आयईसीसीचा सदस्य असल्याकारणाने मुंबई काँग्रेसला मला कारण कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा अधिकार नाही. पार्टीच्या हितासाठी मी राष्ट्रीय अध्यक्षांना काही पत्र लिहिली आहेत. परंतु त्यांची उत्तरे आली नाहीत. माझ्याकडे खूप पुरावे आहेत व जेव्हा वेळ येईल तेव्हा मी त्या गोष्टींचा खुलासा करेन, असं सांगत विश्वबंधु राय यांनी मुंबई काँग्रेसवरच पलटवार केला आहे.
हे ही वाचा - Mumbai Cruise Drug Case : क्रुझ ड्रग्ज पार्टीतून आर्यन खानला अटक ते जामीन नाकारण्यापर्यंतचा 'असा' आहे घटनाक्रम..
मुंबईमध्ये कांदिवली, चारकोप, अंधेरी, दहिसर, कलिना, भांडुप, चांदिवली, वांद्रे या भागात उत्तर भारतीयांची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस उत्तर भारतीयांसाठी संमेलन भरवणार आहे, अशी घोषणा मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी या अगोदरच केली आहे. परंतु विश्वबंधू राय यांनी उत्तर भारतीयांच्या प्रश्नावर मुंबई काँग्रेसवर सातत्याने केलेले आरोप पाहता काँग्रेस हायकमांडने या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले नाही तर येणाऱ्या मुंबई महानगर पालिकेत याचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो असे म्हटले जात आहे.