मुंबई - महाविकास आघाडी सरकारवर ओढवलेल्या ( ajit pawar comment on eknath shinde allegations ) संकटात राष्ट्रवादी खंबीरपणे शिवसेनेच्या मागे उभे आहे. हे सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वास बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ( fund distribution ajit pawar clarity ) यांनी व्यक्त केला आहे. सध्या शिवसेनेमध्ये आमदारांचे दोन गट पडले असून, याबाबत शिवसेनेच्या नेत्यांकडून अधिक स्पष्ट करून दिले जाईल. मात्र, महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाले असून हे सरकार अजून टिकले पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांना धमकावू नका, परिणाम भोगावे लागतील: नारायण राणे
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांची, आमदारांची, खासदारांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री धनंजय मुंडे असे सर्व महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते.
कोणालाही निधी कमी पडू दिला नाही - एकनाथ शिंदे गटाने सातत्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आमदारांची गळचेपी होत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेना आमदारांना निधी दिला जात नसल्याचाही आरोप एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येतोय. मात्र, या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सरकार अस्तित्वात आले त्यावेळेस 36 पालकमंत्री नेमण्यात आले. तिन्ही पक्षाचे समान पालकमंत्री नेमण्यात आले. निधी देताना कोणतीही काटछाट करण्यात आली नाही. निधी वाटताना आपण कधीही दुजाभाव केला नाही. सर्वांना विकास कामांमध्ये मदत करण्याची भूमिका नेहमीच ठेवली आहे. निधीबाबत काही प्रश्न उपस्थित राहत असतील तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होत असताना त्याबाबत भूमिका मांडायला हवी होती. त्यामुळे, समज गैरसमज दूर झाले असते, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी यावेळी दिले.
राऊतांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे, अशी नाराज आमदारांची इच्छा असेल तर त्यांनी मुंबईत येऊन तशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करावी. ही मागणी केल्यानंतर सत्तेतून बाहेर पडण्याबाबत शिवसेना विचार करेल, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. मात्र, संजय राऊत यांनी असे वक्तव्य का केले? हे त्यांनाच माहीत असेल. मात्र, त्यांनी असे वक्तव्य केले असले तरी, त्यावर आता टीकाटिप्पणी करणार नाही. या परिस्थितीत सामंजस्याची भूमिका घेऊन या परिस्थितीतून कसे बाहेर पडता येईल त्याबद्दल प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नक्की विचारण्यात येईल, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.
आघाडीचे सरकार टिकावे ही राष्ट्रवादीची भूमिका, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया - हे सरकार वाचवण्यासाठी जे शक्य असेल ते सहकार्य व मदत उद्धव ठाकरे व शिवसेनेला राष्ट्रवादी करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणाने उभी आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला. काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी यांची बैठक पार पडली. त्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. या सगळ्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना गेलेल्या आमदारांना परत आणण्यात यश मिळेल आणि निश्चितपणे आघाडीचे सरकार टिकावे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व आमदार खासदार पदाधिकार्यांची काल बैठक बोलावली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण पन्नास आमदार उपस्थित होते. काही आमदार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे थेट उपस्थित होते तर काही आमदार ऑनलाइन माध्यमातून बैठकीला उपस्थित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बारीक लक्ष असल्याचे अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरे अॅक्टिव्ह मोडवर.. कार्यकर्त्यांना म्हणाले हिंदुत्वावर कायम, पक्षबांधणीसाठी योगदान द्या