मुंबई - स्पेक्ट्रम घोटाळ्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात प्रतिवादी व भारत सरकारचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) विनोद राय यांनी काँग्रेस नेते संजय निरुपम यांची लिखित स्वरुपात माफी मागितली. पण, त्यांनी फक्त संजय निरुपम यांची लिखित माफी मागून उपयोग नाही, तर त्यांनी केलेल्या षडयंत्रासाठी त्यांनी संपूर्ण देशाची लिखित माफी मागायला हवी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेस नेते अजय माकन यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत केली.
हेही वाचा - परमबीर सिंग कसे पळाले? याचे उत्तर केंद्र सरकार आणि भाजपने द्यावे - मंत्री नवाब मलिक
लोकपाल बिलाची आज काय अवस्था आहे
अजय माकन पुढे म्हणाले की, जंतर मंतर येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली लोकपाल बिलसाठी ज्यावेळेला आंदोलन झाले ते याच विनोद राय यांच्या कार्यकाळात झाले. बाबा रामदेव, अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि मनीष सिसोदिया आणि जनरल व्ही.के. सिंह यांनी त्यावेळेस त्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर २०१४ मध्ये हे लोकपाल बिल पास झाले. पण, हे लोकपाल २०१५, २०१६, २०१७, २०१८ मध्ये सुद्धा सुरू झाले नाही. मार्च २०१९ मध्ये लोकपाल सुरू झाले. आज मी असे विचारतो की, त्या लोकपालची काय स्थिती आहे. ते कशा रीतीने काम करत आहे. लोकपालच्या कायद्याअंतर्गत अभियोग संचालक (Director of Prosecution) केस फाईल करू शकतो आणि डायरेक्टर ऑफ इन्क्वायरी त्या अंतर्गत चौकशी करण्याचे काम केले जाते. पण, सत्य परिस्थिती ही आहे की, आजपर्यंत अभियोग संचालकाची (Director of Prosecution) नेमणूक झालेली नाही आणि डायरेक्टर ऑफ इन्क्वायरीचीही नेमणूक झाली नाही. लोकांचा लोकपालवरून विश्वास उडालेला आहे. मग आता लोकपाल आणण्यासाठी आंदोलन करणारे लोक आज मूग गिळून गप्प का बसले आहेत? ते आता का बोलत नाहीत?
काळे धन भारतात कधी आणणार
अजय माकन पुढे म्हणाले की, बाबा रामदेव आणि भाजपचे नेते मोठमोठ्या घोषणा देऊन मागणी करत होते की, १७ लाख ५० हजार कोटी काळे धन (ब्लॅक मनी) जे स्विस बँकेत आहेत, ते पैसे भारतात यायला हवेत आणि त्यावर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये आश्वासन दिले की, हे पैसे भारतात परत आल्यावर देशातील प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५ - १५ लाख रुपये जमा केले जातील. अशीच खोटी आश्वासने जनतेला देऊन भाजप खोटेपणाने सत्तेवर आले आणि आता सत्तेत आल्यावर यांची बोली कशी बदलते पहा. २५ जुलैला अर्थमंत्र्यांना विचारणा करण्यात आली की, स्विस बँकेत आता किती काळे धन आहे. त्यावेळेस अर्थ मंत्रालयाकडून हे जाहीर करण्यात आले की, आमच्या सरकारकडे स्विस बँकेमध्ये किती काळे धन आहे, याबाबत कसलीही माहिती नाही. जर, तुमच्याकडे कसलीही माहिती नाही मग तुम्ही सर्वच्या सर्व काळे धन भारतात आणणार, असे खोटे आश्वासन कसे काय देऊ शकता. दरवर्षी स्विस बँक एक यादी काढते की, कोणत्या देशातील किती पैसे आमच्याकडे जमा आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्विस बँकेमध्ये मागच्या वर्षी तीन पट काळे धन स्विस बँकेत भारतातून जमा झाले जे मागील १२ वर्षांत सर्वात जास्त आहे. काँग्रेस नेहमीच मागणी करतात की, हे पैसे जमा आहेत, ते कुणा कुणाचे आहेत, याची यादी जाहीर करावी. कारण काळे धन देशात परत येण्याऐवजी तीन पटीने जास्त स्विस बँकेत जमा झालेले आहे. पण, भाजप सरकारमधील लोक ही यादी जाहीर करत नाहीत, असा आरोप अजय माकन यांनी भाजपवर केला आहे.
हेही वाचा - कलाबेन डेलकर यांच्या रुपाने शिवसेनेची राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री