मुंबई - महानगरपालिकेने कोरोना रुग्णांच्या बाबतीत मुंबईला चायनाच्या पुढे नेऊन ठेवले आहे. त्यामुळे कोरोना मृतांची आकडेवारी लपवण्यासाठी पालिका आयुक्तांनी कोरोना रुग्णांना ते पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट थेट देऊ नका, असे आदेश खासगी लॅबना दिले आहेत. असे करत पालिका आयुक्तांना रुग्णांची संख्या लपवायची आहे, असा आरोप भाजपचे घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी केला आहे.
रुग्णाला थेट रिपोर्ट मिळणार नसल्याने त्याला वेळेवर उपचार मिळणार नाहीत. तसेच त्याच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसारही होणार असल्याने पालिका आयुक्तांनी आपले आदेश त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी कदम यांनी केली आहे. कोरोना रुग्णांना ते पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट मिळावेत यासाठी भाजपने पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर आमदार कदम पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा... ...अखेर मंत्री थोरात अन् चव्हाण यांच्या मुख्यमंत्री भेटीला मिळाला मुहूर्त
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळाव्यात. तसेच रुग्णवाहिका वेळेवर मिळावी, असे कारण देत पालिका आयुक्तांनी रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट देऊ नका, असे आदेश खासगी लॅबला दिले आहेत. असे आदेश दिल्याने एखाद्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याला त्याची त्वरित माहिती मिळणार नाही. पालिकेकडून संपर्क होईपर्यंत तो अनेकांच्या संपर्कात आल्याने इतरांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. ज्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, त्याची प्रकृती खराब असल्यास त्याच्यावर वेळेवर उपचार न झाल्याने त्याचा जीव देखील जाऊ शकतो. यामुळे पालिका आयुक्तांनी हे परिपत्रक मागे घ्यावे, अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली.
मुंबई महापालिकेने कोरोनाचे 862 रुग्ण लपवले आहेत. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली. नायर रुग्णालयात लॅब सुरू करायची आहे. ही लॅब रुग्ण मेल्यावर सुरू करणार आहात का ? असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेकडे न्युमोनियाची औषधे घ्यायला पैसे नसल्याचा आरोप करत महानगरपालिकेचे बँकांमध्ये 56 हजार कोटी रुपये हळद-कुंकू लावायला ठेवले आहेत का? असा घणाघात देखील आमदार कदम यांनी यावेळी केला आहे.