मुंबई - मुंबई मनपातून शिवसेनेची सत्ता उलथावून लावण्यासाठी ( Ward Structure change in Mumbai ) भाजपने बंडखोर शिंदे गटाला हाताशी धरले आहे. नवी प्रभाग रचना बदलून नुकतेच जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेऊन शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नेते ( Aditya Thackeray visiting shivsena branches) आदित्य ठाकरे यामुळे सतर्क झाले असून त्यांनी मुंबईतील शाखांचा धांडोळा ( Shivsena branches in Mumbai ) घेण्यास सुरुवात केली आहे. निष्ठा, शिवसंवाद यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता आदित्य ठाकरे नियमित शाखांना भेटी देणार आहेत. शिंदे गट आणि भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
हेही वाचा - Monsoon Updates : पुढचे 4 - 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई महापालिका निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी बंडखोर शिंदे गटाने भाजपला हात दिला आहे. त्यामुळे, पक्षातील फुटी नंतर मुंबई मनपातील सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. अशातच जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे सतर्क झाले असून त्यांनी मुंबईतील शाखांना भेटी देऊन आढावा घेण्याचा धडाका सुरू केला आहे.
शाखांना भेटी - आदित्य ठाकरेंनी बुधवारी भायखळा, वरळी आणि प्रभादेवी येथील शाखांना भेटी दिल्या. शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवसेनेने केलेली कामे घराघरापर्यंत पोहचवा, केलेल्या कामांची माहिती द्या, नवीन मतदार यादी आणि मतदार याद्यांची नोंद वाढवा, असे आवाहन केले. तसेच, हे सरकार बेकायदेशीर असून पडणार असल्याचे ते म्हणाले. तसेच, मुंबईतील सर्वच शाखांना भेटी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकार घाबरले - शिवसेनेचे आमदार खासदारांनी ज्यांच्या नेतृत्वात बंडखोरी केली त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. सरकार निवडणुकीला घाबरत आहे. त्यामुळेच, नगरविकास मंत्री असताना घेतलेला नवीन प्रभाग रचनेचा निर्णय मुख्यमंत्री झाल्यावर रद्द केला. त्यांच्यात हिंमत नाही. त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले आहे.