मुंबई - राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर संजय राऊतांनी काही अपक्ष आमदारांनी दगा दिल्याचा आरोप केला होता. त्यात मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार ( MLA Devendra Bhuyar ) यांचाही समावेश होता. संजय राऊतांच्या ( Shiv Sena leader Sanjay Raut ) आरोपांनंतर आता देवेंद्र भुयारही आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे. पवारांनी त्यांची समजूत काढली. तसेच पवारांच्या भेटीनंतर ते थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. आपण महाविकास आघाडी सोबत होतो. शिवाय विधानपरिषदेतही आपण महाविकास आघाडीलाच मतदान करणार असल्याचे भुयार यांनी म्हटले आहे. यावेळी निधी वाटपावरुनही संजय राऊतांनी भुयारांची समजूत काढल्याची माहिती आहे.
'...म्हणून गडबड झाली' : संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या आरोपानंतर देवेंद्र भुयार यांनी देखील याबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. मुंबई त्यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक निवास्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट खासदार संजय राऊत यांची मुंबईच्या पंचतारांकित ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट घेऊन आपण राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आपण मतदान केल्यानंतर तेथे काही काळ थांबायचे होते. इतर दोन अपक्ष आमदार येईपर्यंत थांबण्या ऐवजी आपण थेट निघून गेल्यामुळे ही सर्व गडबड झाली असल्याची या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
'त्यांची चौकशी करा' : संजय राऊत यांचा गैरसमज आपण दूर केला. तसेच अपक्ष आमदारांच्या निधीबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली असून मतदारसंघासाठी आपण निधी मागत आहोत. कोणत्याही वैयक्तिक कामासाठी निधी मागितला जात नाही, असे या भेटीनंतर भुयार म्हणाले. यासोबतच संजय राऊत यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर कोणतेही संभ्रम आता राहिले नाहीत. या भेटीत विधानपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीबाबत देखील चर्चा झाली असून या निवडणुकीतही आपण महाविकासआघाडी सोबतच आहोत, हे संजय राऊत यांना सांगितले असल्याचे भुयार म्हणाले आहेत. ज्या अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला मतदान केले नाही. त्याची चौकशी संजय राऊत करत आहेत. माझ्याबाबत शरद पवार यांच्याशी संजय राऊत यांनी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणार आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारसोबत असलेल्या कोणत्या पक्षाचे आमदार फुटले याबाबत माहिती समोर यायला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र भुयार यांनी या भेटीदरम्यान संजय राऊत यांच्याकडे केली आहे.