मुंबई- वेगवेगळ्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले राजकीय नेते, आमदार, मंत्री यांना तुरुंगात गेल्यानंतर अनेक आजाराने ग्रासले जाते. त्यामुळे त्यांना उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात नेण्याची मागणीदेखील होत असते. त्यातच आता राज्यातील राजकारणातील तीन मोठे नेते सध्या वेगवेगळ्या कारणास्तव जेलमध्ये आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आणि खासदार नवनीत राणा हे सध्या जेलमध्ये असून, त्यांनी विविध आजाराकरिता खाजगी रुग्णालयात उपचारासाठी न्यायालयात अर्ज केला ( Politicians Demands Treatment ) आहे.
पुढाऱ्यांना खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता नेण्याचा प्रसंग अनेकदा महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेला आहे. यापूर्वी देखील जेलमध्ये असलेल्या अनेक राजकीय पुढाऱ्यांना जामीन मिळालेला नव्हता. त्यांना उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना देखील अनेकदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
नवनीत राणा यांच्या वकिलांचं अधीक्षकांना पत्र : नवनीत राणा यांच्या वकिलांनी भायखळा जेलच्या अधीक्षकांना पत्र पाठवत तक्रार केली आहे. नवनीत राणा यांना स्पॉंडिलायसिसची समस्या आहे. जेलमध्ये सतत फरशीवर बसल्यानं आणि झोपण्यामुळं ही समस्या वाढत आहे. यामुळं नवनीत राणा यांना 27 एप्रिल रोजी जेजे रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. जेजेमधील डॉक्टरांनी सिटी स्कॅन करायला सांगितलं होतं. मात्र, ते अजून केलेलं नाही. त्यांना गंभीर दुखण्याने ग्रासलं आहे. सीटी स्कॅन न केल्यानं उपचार काय करायचे हे ठरवू शकत नाही. आम्ही संबंधित यंत्रणेला अर्ज दिला मात्र, त्यावर विचार केला गेला नाही. जर त्यांची प्रकृती बिघडली तर त्याला जबाबदार आपण असाल असंही आम्ही सांगितलं आहे, असं पत्रात म्हटलं आहे. हीच तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पाठवली आहे.
अनिल देशमुखांनी मागितली परवानगी : जेजे रुग्णालयात उपचारासाठीच्या सुविधा अपुऱ्या आहेत. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुखांनी कोर्टाकडे परवानगी मागितली. जेजे हॉस्पिटलकडून यावर अहवाल आल्यावर निर्णय घेऊ असं कोर्टानं म्हटलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज कोर्टात आपल्या आजारांबद्दल स्वतः न्यायाधीशांना माहिती दिली. अनिल देशमुख यांना खांदेदुखी असून, हृदयविकाराची समस्या असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं. अनिल देशमुखांच्यावतीनं घरचे जेवण मिळावं म्हणून कोर्टाकडे अर्ज दाखल करण्यात आला. खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यासंदर्भात ईडीनं उत्तर देण्यास वेळ मागितला आहे. मात्र, घरच्या जेवणासाठी ईडीचा विरोध नाही. कोर्टानं याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असं ईडीनं म्हटलं. अनिल देशमुख यांच्या दोन्ही अर्जांवर 4 मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत निर्णय घेतला जाईल. अनिल देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश जेजे रुग्णालयाला मुंबई सत्र न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन अर्ज : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आले आहे. तीन दिवसांपासून नवाब मलिक यांना ताप आणि अशक्तपणा जाणवत असल्याने तसेच जेलमध्ये चक्कर येऊन पडल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. वकिलांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मलिक यांची तब्येत खराब असल्याने त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. यापूर्वी देखील त्यांना जे जे रुग्णालयात काही आजारामुळे भरती करण्यात आले होते. नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर देखील 5 मे रोजी सुनावणी होणार आहे.
हेही वाचा : Nawab Malik JJ Hospitalized : कॅबिनेट मंत्री नवाब मलिक जे जे रुग्णालयात भर्ती