मुंबई - गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या विरोधात अंधेरी येथील न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कंगनाने आपल्याला या न्यायालयात न्याय मिळेल यावर विश्वास नसल्याने खटला इतर न्यायालयात चालवावा अशी मागणी केली आहे. त्यावर असा खटला इतर न्यायालयात चालवला जाऊ शकतो. इतर न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केल्यास तशी कायद्यात तरतुद आहे, अशी माहिती मुंबई उच्च वन्यायलयाचे वकील अॅड. नितीन सातपुते यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली.
अभिनेत्री कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र हे आरोप तथ्यहिन आणि बोगस आहेत, असा आरोप अख्तर यांनी केला आहे. त्यासाठी अख्तर याणी अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयात कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. न्यायालयाने याची दखल घेत जुहू पोलीस ठाण्याला यावर चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर अख्तर यांच्या तक्रारीत तथ्य आहे, असे पोलिसांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.
अंधेरी न्यायालयातील खटल्याची कारवाई रद्द करण्यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. दंडाधिकारी न्यायालयाने नियमबाह्य पध्दतीने ही कारवाई केल्याचा आरोप कंगनाने याचिकेतून केला होता. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. जावेद अख्तर यांच्यावतीने दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणी केलेली कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेनुसारच केली आहे. तसेच अब्रुनुकसानीच्या फौजदारी दाव्यात आवश्यक असलेल्या तरतुदींचे पूर्ण पालन करण्यात आले आहे, असा दावा केला आहे.
हेही वाचा-धक्कादायक : गोंदिया जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या
खटला इतर न्यायालयात चालवा -
आपल्यावर करण्यात येणारी कारवाई पोलिसांनी केलेल्या चौकशीवर आहे. न्यायालयाने स्वतंत्र चौकशी केली नाही, असा बचाव कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला आहे. या प्रकरणी कंगना न्यायालयात उपस्थित राहत नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त करत पुढील तारखेला हजर न झाल्यास अटक वॉरंट काढण्याचा इशारा दिला होता. यामुळे कंगना अंधेरी न्यायालयात सोमवारी उपस्थित झाली. त्यावेळी आपल्याला या न्यायालयात न्याय मिळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. हा खटला इतर न्यायालयात चालवावा, अशी मागणीही कंगनाने केली आहे.
हेही वाचा-अखेर राज कुंद्राला जामीन मंजूर, अडीच महिन्यानंतर आला तुरुंगाबाहेर
सामान्य नागरिकांना अधिकार -
कंगनाने खटला इतर न्यायालयात चालवावा अशी मागणी केली आहे. ज्याच्यावर खटला चालू आहे अशा व्यक्तीला आपल्याविरोधात चालू असलेला खटला योग्य प्रकारे चालवला जात नाही. पूर्वग्रहदूषित पद्धतीने तो खटला चालवला जात असल्याचे निदर्शनास आल्यास ती व्यक्ती आपला खटला इतर न्यालयात चालवावा अशी मागणी करू शकते. तशी कायद्यात तरतूद आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला सत्र न्यायालयात अर्ज करावा लागतो. खटला इतर न्यायालयात चालवावा अशी मागणी कोणताही सामान्य नागरिकही करू शकतो. मात्र सामान्य नागरिकांकडे वेळ नसतो. तसेच केससाठी वकिलांवर होणारा खर्च करण्याची त्याची आर्थिक क्षमता नसल्याने सामान्य नागरिक खटला इतर न्यायालयात चालवण्याची मागणी करत नाहीत, अशी माहिती अॅड. नितीन सातपुते यांनी दिली.