मुंबई - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी आपण एकूण ११ कोटी ३८ लाख रुपये किंमतीच्या संपत्तीचे मालक असल्याचे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. सामाजिक कार्याच्या हेतूने राजकारणात आलेल्या आदित्य ठाकरेंच्या नावावर असलेल्या इतक्या कोटी संपत्तीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
हेही वाचा... माझ्यापाठी सर्वांचा आशीर्वाद - आदित्य ठाकरे
आदित्य हे ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे पहिलेच व्यक्ती आहेत. आदित्य ठाकरे निवडणुकीचा अर्ज भरणार असल्याने त्यांच्या नावे किती संपत्ती आहे, याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यांनी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. या अर्जात नमूद केल्याप्रमाणे आदित्य हे करोडपती असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या नावे एकूण 11 कोटी 38 लाख रुपयांची संपत्ती आहे.
हेही वाचा... मनसेची पहिली यादी जाहीर, वरळीतून उमेदवारीचा निर्णय राज ठाकरे घेतील
उमेदवारी अर्जात त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण ही दिले आहे. त्यानुसार ते एकूण 11 कोटी 38 लाख रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. 6 लाख 50 हजार रुपयांची एक महागडी बीएमडब्ल्यू कार त्यांच्या नावावर आहे. शिवाय, त्यांच्या नावे बँकेत 20 लाख 39 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. याशिवाय 20 लाख 39 हजार रुपयांचे शेअर देखील त्यांनी खरेदी केले असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. आदित्य यांच्याकडे 64 लाख 65 हजार रुपयांचे दागिने, 10 लाख 22 हजार रुपयांची इतर संपत्ती असल्याची नोंद आहे.