मुंबई - आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री १२ वाजता मुंबईचे प्रवेशद्वार चेंबूर पंजरापोल देवनार बेस्ट बस आगार येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुंबईकरांना शिवजयंतीच्या (तिथीनुसार) शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
मुंबईचे प्रवेशद्वार चेंबूर पंजरापोल येथोल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवजयंतीच्या आदल्या रात्री १२ वाजता पुष्पहार अर्पण करून मुंबईत शिवजयंती (तिथीनुसार) साजरी केली जाते. ही परंपरा दिवंगत शरद आचार्य यांनी चेंबूर येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवजयंतीच्या आदल्या रात्री 12 वाजता पुष्पहार अर्पण करून साजरी केली होती. तीच परंपरा आज कायम आहे, असे दक्षिण मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. मुंबईतील शिवप्रेमी किल्ले शिवनेरी येथून शिवजोत घेऊन मुंबईच्या हद्दीत प्रवेश करतात आणि चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत पुढे आपापल्या ठिकाणी मार्गस्थ होतात.
या शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी अग्निशमन दलाची भली मोठी क्रेन आणली होती. त्यात आदित्य ठाकरे आणि मुंबईचे महापौर विशवनाथ महाडेश्वर यांनी उभे राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी मुंबई महानगरपालिका उपमहापौर हेमांगी वरलीकर, आमदार तुकाराम काते, प्रकाश फातर्फेकर व मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.