मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा विरोधामुळे स्थगित करावा लागला. राज ठाकरे यांना कडाडून विरोध करणाऱ्या आयोध्या आणि उत्तर प्रदेश वासियांनी शिवसेना युवा नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मात्र स्वागत केले ( Aditya Thackeray Ayodhya Tour ) आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नवीन फायरब्रँड नेते मानले जातात. शिवसेना हि हिंदुत्ववादी संघटना असल्याचा वारंवार उच्चार शिवसेनेकडून केला जातो. बाबरी मशीदीचा ढाचा पाडण्यात शिवसैनिकांचा हात असल्याचा वारंवार दाखला देत शिवसेना ही कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहे असे सांगून हिंदू मतदारांमध्ये आपले स्थान अधिक बळकट करण्याचा प्रयत्न शिवसेना वारंवार करते आहे. शिवसेना गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात आपले उमेदवार उभे करते आहे शिवसेनेच्या उमेदवारांना आपलं डिपॉझिट वाचवता आले नसले तरी विचाराच्या आधारावर शिवसेना उत्तर प्रदेशात पाय पसरू पाहते आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा त्या अर्थाने फारच महत्वाचा ठरतो. हळूहळू उत्तर प्रदेशात शिवसेना संघटन मजबूत करण्याकडे आदित्य लक्ष देत आहे तर आगामी महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबईत असलेली उत्तर भारतीयांची संख्या पाहता हा दौरा त्यादृष्टीने ही शिवसेनेसाठी आणि हिंदुत्ववादी विचारांच्या मतांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा - Shiv Sena new slogan : '15 जुन चलो अयोध्या', शिवसेनेचा नवा नारा
उत्तर प्रदेशातील शिवसेनेसाठी ताकद देणारा दौरा - मनीषा भावसार
आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा उत्तर प्रदेशातील वाढू पाहणाऱ्या शिवसेनेचा शाखांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आदित्य यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांना बळ मिळणार असून त्यांचा हा दौरा उत्तर प्रदेशात अधिक फलदायी ठरेल असा विश्वास ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केला. राज यांना कडाडून होणारा विरोध आणि आदित्य यांचे स्वागत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. आदित्य यांच्या राजकीय कारकिर्दीची महाराष्ट्राबाहेरील मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ठरणार आहे असेही भावसार यांनी सांगितले.
शाल पांघरून कोणी बाळासाहेब होत नाही - कायंदे
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आजही देशभरात उत्सुकता आहे. जे प्रेम बाळासाहेब यांना मिळाले तेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि आदित्य ठाकरे यांना मिळते आहे. केवळ नावात ठाकरे आहे म्हणून अंगावर भगवी शाल पांघरून कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही. हे सगळ्यांना माहीत आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार प्राध्यापिका मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली.
असली कोण आणि नकली कोण यातील फरक देखील माहिती आहे. म्हणूनच जेव्हा आदित्य यांनी आपला आयोध्या दौरा घोषित केला. तेव्हापासून आयोध्येमध्ये उत्साह पसरला आहे.
शिवसेनेने परप्रांतीयांचा द्वेष केला नाही - बाळासाहेब, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी मुंबईत राहणाऱ्या अन्य प्रदेशातील नागरिकांचा कधी द्वेष केला नाही. त्यांना मारहाण करून पिटाळून लावले नाही. अनेक संकट आलीत, पण मुंबईत अन्य भाषिक खासकरून उत्तर भारतीय नागरिकांचे संरक्षण केवळ शिवसेनेने केले. म्हणूनच नव्या पिढीचे खरे जननायक आदित्य ठाकरे यांचे उत्तर प्रदेशात स्वागत केले जात आहे, असेही कायंदे म्हणाल्या.
हेही वाचा - राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी - केंद्रीय मंत्री रामदास आठवले
हेही वाचा - MP Raut on Ayodhya tour : आदित्य ठाकरें सोबत देशभरातील शिवसैनिक आयोध्या दौऱ्यावर जाणार - खा. राऊत
हेही वाचा - मनसेच्या अपयशाचे 'राज', बदलेल्या भूमिकांही 'बुमरॅंग'