मुंबई - रुग्णालये, महानगरपालिका तसेच हवाई वाहतुकीवर शिवसेनेने स्वत:ची कामगार संघटना उभारून पक्षाचा भगवा झेंडा फडकवला असून, यापुढे जगातील समुद्रावरही सेनेचा झेंडा पाहायला मिळेल, असे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाविक परिषदेत सांगितले. तसेच राष्ट्रीय नाविक कामगार परिषद आपल्या सोबत येत असल्याने हा ऐतिहासिक क्षण असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय नाविक कामगार परिषदेने शिवसेनेला दिलेल्या पाठींब्यानंतर चर्चगेट येथील के.सी. कॉलेजच्या सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.
सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म दिवस एकच आहे. या शुभ मुहूर्तावर (दि. 23ऑगस्ट)ला या युनियनची सुरुवात झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शिवसेनेची भूमिका केवळ अन्याय विरोधात लढण्याची असून, 'जय जवान जय किसान जय कामगार' हा नारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय नाविक कामगारांच्या मागण्यांसाठी शिवसेना पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन युवासेना प्रमुखांनी या सभेत दिले आहे. आता समुद्रापासून दिल्ली पर्यंत जाण्याची आपली ताकद वाढली आहे, असे ते म्हणाले.
फॉरवर्ड सिमेन्स युनियन ऑफ इंडिया या नाविकांच्या संघटनेने 11 राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कामगार यांच्या जनरल बैठकीत ठराव मंजूर करून शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या संघटनेचे 52 हजार 500 सदस्य असून 11 राज्यांत कार्यालये आहेत.
गेले कित्येक वर्षे नाविकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी शिवसेनेसोबत जात असल्याचे संघटनेचे सरचिटणीस नरेश बिरवाडकर यांनी सांगितले.