मुंबई: भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या काही कर्मचाऱ्यांसह गोव्याला गेल्या होत्या. भाजपने सोनाली फोगट यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. हरियाणातील भाजपच्या महिला मोर्चाच्या त्या प्रदेश उपाध्यक्ष होत्या. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये व पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये शोकलहर पसरली आहे. त्यांनी कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात निवडणुक लढवली होती.
सोनाली फोगाट यांचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी हरियाणातील फतेहाबाद इथे झाला. त्यांनी 2006 मध्ये हिस्सार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करून करिअरची सुरुवात केली होती. दोन वर्षांनंतर 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या पक्षाच्या सक्रिय सदस्य होत्या. सोनाली यांचे वडील शेतकरी आहेत. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. सोनाली यांचं लग्न बहिणीच्या दिराशी झाले होते. त्यांना यशोदारा फोगाट ही मुलगी आहे. 2016 मध्ये सोनाली यांचा पती संजय यांचा फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यावेळी सोनाली मुंबईत होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी वसतिगृहात राहते.
सोनाली गेली दहा वर्षा पासून कलेच्या क्षेत्रात काम करत होती, दूरदर्शनमध्ये ही ती कार्यरत होती. याशिवाय मॉडेलिंग तसेच अनेक मालिकांमध्येही तीने काम केलेले आहे. ऑक्टोबरमध्ये तिचा नवीन चित्रपट येत आहे. सोनाली यांनी ‘अम्मा’ या टीव्ही मालिकेत नवाब शाहच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय त्या बंदुक आली जाटणी या हरियाणवी गाण्यातही दिसली. त्यांनी द स्टोरी ऑफ बदमाजगढ या वेब सीरिजमध्येही काम केले होते.
सोनाली या सोशल मीडियावर, विशेषतः टिकटॉकवर खूप सक्रिय होत्या. टिकटॉकवर त्यांना 1 लाख 32 हजार युजर्स फॉलो करत होते. दररोज त्या टिक टॉकवर अनेक नव-नवे व्हिडीओ बनवून पोस्ट करायच्या. त्यांना टिक टॉक स्टार म्हणूनही ओळखले जायचे. बिग बॉसच्या 14 व्या पर्वातही त्यांनी हजेरी लावली होती. सोनाली फोगटचे पती संजय फोगट हे भाजपचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर भाजपने सोनाली फोगट यांची पक्षाच्या राज्य महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.