मुंबई - अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणजेच सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'अगोबाई सासूबाई' या मालिकेतील 'बबड्याची आई आसावरी' यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांनी घरीच क्वारंटाईन होऊन डॉक्टरांचा मार्गदर्शनाखाली उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने शुटिंगवर घातलेले निर्बंध उठवल्यावर इतर मालिकाप्रमाणे 'अगोबाई सासूबाई' या मालिकेचे चित्रीकरण देखील मुंबईत सुरु झाले. झी मराठीच्या इतर मालिकांचे शुटिंग मुंबईच्या बाहेर रिसॉर्टवर होऊ लागली असली, तरी अगोबाई सासूबाई या मालिकेचे शुटिंग मात्र मुंबईतच सुरू होते. त्यातही सेटवरील तंत्रज्ञ आणि स्पॉट यांनी एकदा लाईट्स आणि केमेरा अँगल ठरवल्यानंतर फक्त कलाकार, दिग्दर्शक आणि केमेरामन एवढ्याच लोकांना सेटवर उपस्थित राहण्याची परवानगी होती. याशिवाय या मालिकेच्या सेटवर दररोज सर्व लोकांचे चेकिंग होत असे, मात्र तरीही निवेदिता यांना करोनाचा संसर्ग झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या मालिकेचे शुटिंग पुन्हा सुरू होणार होते तेव्हा कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मुंबईत वाढत होती. तेव्हा परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत शुटिंग न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, नंतर सहकलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते आणि चॅनल यांचामुळे त्यांनी काही अटींवर चित्रीकरण पुन्हा सुरू करायला होकार दिला होता. काल (मंगळवारी) कोरोनामुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले. यानंतर मराठी मालिकांच्या शुटींगच्या ठिकाणी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही याबाबत चर्चा सुरु झाली होती. त्यातच आज सेटवर एवढी काळजी घेऊनही निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मालिकांची शुटिंग सुरु ठेवणे योग्य की अयोग्य याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा - अमली पदार्थ प्रकरण : दीपिका पादुकोणसोबत बॉलिवूडच्या प्रमुख अभिनेत्रींची एनसीबी करणार चौकशी