मुंबई - अलिकडेच एका मॅगझिन फोटोशूटसाठी ( magazine photoshoot ) नग्न पोझ दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग ( Ranveer Singh ) वादात सापडला आहे. त्याने चौकशी दरम्यान मुंबई पोलिसांना एका निवेदनात सांगितले आहे की त्याच्या फोटोमध्ये कोणीतरी छेडछाड केली असून त्यातील एक फोटो मॉर्फ केला आहे.
रणवीरने गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांकडे नग्न फोटोशूट प्रकरणात त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरवर आपला जवाब नोंदवला आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने त्याच्या निवेदनात दावा केला आहे की कोणीतरी अभिनेत्याच्या फोटोंशी छेडछाड केली आहे आणि त्याचा एक फोटो मॉर्फ केला आहे.
चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून २६ जुलै रोजी रणवीरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. वृत्तानुसार, एनजीओच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार प्राप्त केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभिनेत्याने त्याच्या नग्न फोटोंनी महिलांच्या भावना दुखावल्या असल्याचे तक्रारीत म्हटले होते.
29 ऑगस्ट रोजी रणवीर सिंगने मुंबईतील चेंबूर पोलिस ठाण्यात त्याचा जबाब नोंदवला होता. मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 292 (अश्लील पुस्तकांची विक्री इ.), 293 (तरुणांना अश्लील वस्तूंची विक्री), 509 (शब्द, हावभाव किंवा कृती) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदी यांसारख्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला होता.
रणवीरच्या वादग्रस्त फोटोशूटची छायाचित्रे २१ जुलै रोजी ऑनलाइन पोस्ट करण्यात आली होती. त्या फोटोंमध्ये रणवीरने कपडे घातलेले नाहीत.
दरम्यान, वर्क फ्रंटवर रणवीर नुकताच नेटफ्लिक्सच्या इंटरएक्टिव्ह स्पेशल 'रणवीर वर्सेस वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स' मध्ये दिसला ज्याला जगभरातील नेटिझन्सकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तो पुढे रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाच्या 'सर्कस' या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडेसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 2022 च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय रणवीरकडे आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्यासोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' देखील आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
हेही वाचा - हृतिक सैफचा विक्रम वेधा रचणार इतिहास, १०० हून अधिक देशात होणार रिलीज