मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याच्या घरावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून छापेमारी करण्यात आली. आता या संदर्भात अर्जुन रामपाल याला 'एनसीबी'कडून चौकशीचे समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार येत्या 11 नोव्हेंबर रोजी रामपाल याला सकाळी एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आता बॉलिवूडमधील 'ड्रग सिंडिकेट' प्रकरणात एनसीबीच्या रडारवर अर्जुन रामपाल असल्याची माहिती मिळत आहे.
नायजेरियन तस्कराकडून मिळाली माहिती
गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून बॉलिवूडमधल्या ड्रग्स सिंडिकेटच्या संदर्भात तपास सुरू आहे. यामध्ये बॉलीवूड टीव्ही कलाकारांना अमली पदार्थांचा पुरवठा करणारे तस्कर रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी एनसीबीकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली होती. या तस्कराची चौकशी केल्यानंतर त्याच्या संपर्कात क्षितिज प्रसाद आणि अॅजिसिलाओस (अर्जुनच्या प्रेयसीचा भाऊ) हे दोघे असल्याचे समोर आले. त्यानंतर या दोघांना आणखी एका प्रकरणामध्ये अटक केल्याचे दाखवण्यात आले आहे.
घरी उपस्थित नव्हता अर्जुन रामपाल
अर्जुन रामपालच्या घरी मारलेल्या छाप्यादरम्यान अमली पदार्थ मिळाल्याची कोणतीही माहिती अद्याप देण्यात आली नाही. या कारवाईच्या वेळी अर्जुनच्या घराची झडती घेण्यात आली. ड्रग्जसंदर्भात काही आक्षेपार्ह वस्तू किंवा कागदपत्रे सापडतात का, याचा शोध घेण्यात आला. दरम्यान, यावेळी अर्जुन रामपाल घरात उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. कारवाईच्या वेळी त्याच्या घरी कोणकोण उपस्थित होते, याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.