मुंबई - मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार (Corona Spread in Mumbai) आहे. हा प्रसार कमी झाला असतानाच डिसेंबरपासून पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली (Corona Cases Hike) आहे. ६ जानेवारीला रुग्णसंख्या २० हजारांवर गेली आहे. यामुळे गेल्या महिनाभरात सक्रिय रुग्ण, सील इमारती आणि कंटेनमेंट झोनची संख्या वाढली आहे. गेल्या महिनाभरात सक्रिय रुग्णांमध्ये ७७ हजाराने वाढ झाली आहे. तर महिनाभरात ३२ झोपडपट्ट्या आणि ४४८ सील इमारतींची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना रुग्ण ४ ते ५ दिवसात बरे होत आहेत. यामुळे मुंबईकरांनी घाबरू नये पण काळजी घेऊन कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.
- ७७ हजार २०८ सक्रिय रुग्ण वाढले -
३० नोव्हेंबरला २०५२ ऍक्टिव्ह रुग्ण होते, त्यात ११२८ लक्षणे नसलेले, ७५१ लक्षणे असलेले तर १७३ क्रिटिकल रुग्ण होते. २ जानेवारीला २९ हजार ८१९ ऍक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. ५ जानेवारीला ६१ हजार ९२३ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात ५३ हजार ८७५ लक्षणे नसलेले, ७७३१ लक्षणे असलेले तर ३१७ क्रिटिकल रुग्ण आहेत. ६ जानेवारी रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ७९ हजार २६० वर गेली आहे. यामुळे गेल्या महिनाभरात ७७ हजार २०८ सक्रिय रुग्णामध्ये वाढ झाली आहे.
- सील इमारती, झोपडपट्ट्यांमध्ये वाढ -
३० नोव्हेंबरला झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण आढळून येत नसल्याने एकही झोपडपट्टी सील करण्यात आली नव्हती. तर १८ इमारती सील करण्यात आल्या होत्या. ६ जानेवारीला ३२ झोपडपट्ट्या आणि ५०२ इमारती सील करण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरात ३२ झोपडपट्ट्या आणि ४४८ सील इमारतींची वाढ झाली आहे.
- महिनाभरात ९० हजार ९२८ रुग्णांची नोंद -
मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. या दोन्ही लाटा थोपवल्यावर डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना आटोक्यात असताना ३० नोव्हेंबरपर्यंत मुंबईत एकूण ७ लाख ६२ हजार ८८१ रुग्णांची नोंद झाली. महिनाभरानंतर ६ जानेवारीला एकूण ८ लाख ५३ हजार ८०९ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात मुंबईत कोरोनाच्या ९० हजार ९२८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
- पालिका सज्ज -
सध्या मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी ९० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. रोज आढळून येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत ५ ते १० टक्के रुग्णांनाच रुग्णालयात तर १ ते २ टक्के रुग्णांना आयसीयू मध्ये दाखल करण्याची गरज भासत आहे. पालिकेकडे सध्या ३५ हजार बेड्स असून कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयातील बेड्स सज्ज ठेवले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा असून तिप्पट साठा करण्या इतकी पालिकेची क्षमता आहे. रुग्णांना लागणारी औषधे, इंजेक्शन यांचा साठा आहे. सध्या ८५ टक्क्याहून अधिक बेड रिक्त आहेत. तसेच रुग्ण ४ ते ५ दिवसात बरे होऊन घरी जात असल्याने बेड्स रिक्त आहेत. तरीही कोणत्याही प्रकारची कमरेत राहू नये म्हणून खाटा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन खाटा आदी उपकरणे औषधें तयार ठेवली आहेत अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
- अशी वाढली रुग्णसंख्या -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १ हजार ३७७, २९ डिसेंबरला २ हजार ५१०, ३० डिसेंबर ३ हजार ६७१, ३१ डिसेंबरला ५ हजार ६३१, १ जानेवारीला ६ हजार ३४७, २ जानेवारीला ८ हजार ६३, ३ जानेवारीला ८ हजार ८२, ४ जानेवारीला १० हजार ८६०, ५ जानेवारीला १५ हजार १६६, ६ जानेवारीला २० हजार १८१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
- नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.