मुंबई - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने आणि रेल्वे प्रशासनाने बेजबाबदारपणे वागणाऱ्या लोकांना दंड ठोठावण्याचा उपक्रम सुरू केला. रेल्वेने सुद्धा प्रवाशांकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याने अनधिकृत 2 हजार 18 प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे 10 लाख 9 हजार इतकी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आलेला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. तसेच कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनांकडून करण्यात आले होते. तसेच सर्व सामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनचे दार बंद करण्यात आले आहे. तसेच फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलचा प्रवासात मुभा देण्यात आली आहे. या प्रवासात कोविडचे नियम पाळण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले होते. तरी सुद्धा कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाही लोक फिजिकल डिस्टन्स न ठेवता गर्दी करत होते. तसेच तोंडाला मास्क न लावता बिनधास्त फिरत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई रेल्वेकडून करण्यात आली आहे. कोरोनाच्या महामारीत नियम मोडल्यामुळे 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीत सुमारे 2 हजार 18 प्रकरणांची नोंद करण्यात आली. तर, यांच्याकडून 10 लाख 9 हजार इतकी रक्कम वसूल केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
रेल्वे प्रवाशांना आवाहन -
उपनगरी गाड्यांमध्ये आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोहिमेदरम्यान ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, सिस्टमद्वारे व्युत्पन्न तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे अशा अनियमितता प्रामुख्याने लक्षात आल्या. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करावेत आणि शासनाने घालून दिलेल्या कोविड नियामाणचे पालन करण्याचे आवाहन मध्य रेल्वे करीत आहे.