मुंबई - अपक्ष आमदारांनी ( Independent MLA ) राज्यसभा निवडणुकीत ( Rajya Sabha Election ) आम्हाला मदत केली नाही, असे म्हणत सहा अपक्ष आमदारांवर शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आरोप केला. या आरोपावर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी आक्षेप घेतला आहे. सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आहे. या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी आज दिली. मुंबईत आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह - किरीट सोयमय्या म्हणाले की, अशाप्रकारे थेट लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करून त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याचे काम शिवेसेनेचे नेते खासदार संजय राऊत करत आहेत. आमदार हे लोकप्रतिनिधी असतात. लोकप्रतिनिधी असलेल्या आमदारांवर थेट नाव उघड करून असा आरोप करणे चुकीचे आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून आपल्या आमदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला होता. मात्र अपक्ष आमदारांवर असे कोणत्याही प्रकारचा व्हीप जारी करता येत नाही. या अपक्ष आमदारांनी कोणाला मतदान केले हेदेखील सांगावे लागत नाही. तथापि, संजय राऊत हे त्यांची नावे जाहीर करत असल्याचे पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले.
गोपनीयतेचा भंग - अपक्ष सहा आमदारांनी कोणाला मत करावे हे उघडपणे सांगणे गोपनीयतेचा भंग नव्हे का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या विरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा दुसरा उमेदवार असलेले संजय पवार यांचा पराजय झाला आहे. अपक्ष आमदारांनी शिवसेनेसोबत गद्दारी करत ही मते विरोधकांना दिले असल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून झाला आहे. त्यामुळे सहा अपक्ष आमदारांबाबत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करत आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा उपयोग करून ही मते आपल्याजवळ फिरवली असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा - राष्ट्रपतीपद निवडणूक : सोनिया गांधींनी साधला शरद पवार, ममता बॅनर्जींशी संपर्क