मुंबई - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने आतापर्यंत २३ लाख २५ हजार विनामास्क नागरिकांवर कारवाई करत एकूण रुपये ४६ कोटी ८७ लाख ५७ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
४६ कोटी ८७ लाखांचा दंड -
मुंबईमध्ये मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार होऊ लागला. हा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने मास्कची सक्ती केली. मास्क लावला नसल्यास सुरुवातीला १ हजार रुपये दंड वसूल करण्यात येत होता. पुढे हा दंड कमी करून २०० रुपये इतका करण्यात आला. २० एप्रिल २०२० पासून २६ मार्च पर्यंत ३६० दिवसात २३ लाख २५ हजार ६३४ नागरिकांवर कारवाई करत ४६ कोटी ८७ लाख ५७ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्यासाठी विभागवार क्लिनअप मार्शलची नियुक्ती केली आहे. तसेच पोलिसांकडूनही विनामास्क नागरिकांवर कारवाई केली जात आहेत. पोलिसांकडून जो दंड वसूल केला जातो. त्यामधील ५० टक्के दंडाची रक्कम पोलिसांना तर ५० टक्के दंडाची रक्कम पालिकेला दिली जाते.
पालिका पोलिसांकडून दंड वसुली -
बृहन्मुंबई महानगरपालिकेने २० लाख ९० हजार ३१ लोकांवर कारवाई करत ४२ कोटी १६ लाख ३६ हजार ४०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी २ लाख १७ हजार ८९४ नागरिकांवर कारवाई करत ४ कोटी ३५ लाख ७८ हजार ८०० रुपये दंड वसुली केली आहे. तर उपनगरीय रेल्वे मध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या १७ हजार ७०९ प्रवाशांवर कारवाई करत आतापर्यंत ३५ लाख ४१ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे.