मुंबई - मुंबई पोलिसांनी मंगळवारी अशा एका आरोपीला अटक केली आहे, की ज्याने देशातील दिल्ली, चेन्नई, बंगळुरू या सारख्या शहरातील विमानतळांवर अनेक व्यक्तींना गंडा घातला आहे. यासाठी तो आई आजारी आहे, मेडिकल कॉलेजची फी भरायची आहे, फ्लाइट चुकली आहे, बॅग गाडीतच विसरलो आहे, अशी विविध खोटी कारणं सांगून प्रवाशांची आर्थिक फसवणूक करायचा. मोडेला गणपती दिनेश कुमार (वय 22) असे या आरोपीचे नाव आहे.
असा पकडला आरोपी
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील पीडित तक्रारदार रघुनंदन सुभाष ठकरे हे 1 जानेवारी रोजी नागपूर येथे जाण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले असता, त्या ठिकाणी आधीच हजर असलेल्या आरोपीने त्यांना परीक्षेसाठी चंदीगडला जायचे आहे, परंतु फ्लाईट चुकल्यामुळे आता जाता येणार नाही असे सांगितले. तिकिटासाठी 7500 रुपये दिल्यास चंदीगड येथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत करतो असे आरोपी त्यांना म्हणाला. चेहऱ्याने सुसंस्कृत घरातील वाटणाऱ्या व सफाईदार इंग्रजी बोलणाऱ्या या आरोपीवर पीडित तक्रारदाराने विश्वास ठेवला. ठाकरे यांनी आरोपीला साडेसात हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्यानंतर ठाकरे यांनी आपले पैसे परत मागण्यासाठी या तरुणाला फोन केला. फोन केल्यानंतर आरोपीने पैसे तर दिलेच नाही, उलट त्यांची टिंगल-टवाळी कारायला सुरुवात केली.
5 महिन्यांनी पुन्हा दिसला विमानतळावर
13 जून रोजी रघुनंदन ठकरे हे पुन्हा प्रवासाकरिता मुंबई विमानतळावर आले असता, त्यांना हीच व्यक्ती बॅगेज बेल्ट जवळ संशयास्पदरीत्या हालचाल करताना दिसून आली. त्यामुळे तक्रारदाराने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने आरोपी मोडेल व्यंकट दिनेश कुमार याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, तो मुळ आंध्रप्रदेशमधील असून, त्याने आतापर्यंत दिल्ली, बंगळुरू, चेन्नई अशा देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर 13 व्यक्तींची एकूण 1 लाख 73 हजार 367 रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आले आहे.
हेही वाचा -ओप्पोच्या वापरकर्त्यांना खूशखबर 'या' तारखांना मॉडेलवर मिळणार अपडेट