मुंबई - आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार हे सर्व स्तरांवर अयशस्वी ठरत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे पक्षाने स्पष्ट केले.
महाराष्ट्राला आधी एक विकसनशील राज्य म्हणून ओळखले जात होते. मात्र, भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्व स्तरांवर मागे पडत आहे. आज महाराष्ट्रात दुष्काळ, पूर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीसमस्या, वाढती बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव, वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, लोकांपर्यंत सुविधा पोहोचवण्यात येणारी असफलता, आर्थिक मंदी आणि शिक्षणाचा बाजार अशा अनेक समस्या आहेत.
त्यामुळे, महाराष्ट्राला एका चांगल्या पर्यायाची गरज आहे. 'आप' हा महाराष्ट्रासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. असे मत, 'आप'चे महाराष्ट्र राज्य प्रमुख दुर्गेश पाठक यांनी व्यक्त केले.
यासाठी 'आप'ने एका समितीची नियुक्ती केली आहे. ही समिती महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमधील आपच्या कामावर देखरेख ठेवेल. यामध्ये रंगा राचुर, किशोर मंध्यान, धनंजय शिंदे, जगजीत सिंह, प्रीती शर्मा मेनन, देवेंद्र वानखेडे, कुसुमकर कौशिक, अजिंक्य शिंदे, डॉ. सुनिल गावित, मुकुंद किर्दत आणि संदीप देसाई यांचा समावेश आहे. रंगा राचुर हे या समितीचे अध्यक्ष असतील.