मुंबई - शहरात मुसळधार पाऊस पडला की, हे पावसाचे पाणी समुद्रात सोडावे लागते. समुद्राला भरती असल्यास पाणी समुद्रात सोडता येणे शक्य होत नाही. यामुळे पावसाचे हे पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या बांधण्याची गरज आहे. त्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
मुंबईत कालपासून मुसळधार सुरू आहे. दरम्यान, शहरात पाणी साचल्याने आज आदित्य ठाकरेंनी धारावी आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सला भेट दिली. यानंतर त्यांनी पालिका मुख्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पावसाचे पाणी साठवण्यासाठी भूमीगत टाक्या बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत 103 किलोमीटरचे वारे जुलै महिन्यात आलेल्या वादळादरम्यान वाहत होते. इमारतीवरील छप्पर उडाले होते. मुंबईत असे मी कधी पाहिले नाही. हे वातावरणातील बदल आणि जागतिक पर्यावरण बदल पाहता यावर काम करण्याची गरज असल्याचेही ठाकरेंनी सांगितले.
हेही वाचा - भारत-चीन सीमावाद : सीमेवर आणखी सैनिक तैनात न करण्यावर दोन्ही देशांचे एकमत
मुंबईत 26 जुलै 2005ला मोठा पाऊस पडला, त्यानंतर पालिकेने ब्रिमस्टोव्हेड प्रकल्प हाती घेतले. त्यानुसार मुंबईत पम्पिंग स्टेशन बांधण्यात आली. अद्यापही दोन पम्पिंग स्टेशनचे काम बाकी आहे. त्याच्या परवानग्या मिळवून काम लवकरच पूर्ण केले जाईल. मुंबईत पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या 25 आणि 50 मिलिमीटरच्या वाहिन्या आहेत. त्या सर्व ठिकाणी बदलता येत नसल्या तरी पम्पिंग स्टेशनद्वारे शहरात साचलेले पावसाचे पाणी समुद्रात टाकले जात असल्याचे ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - 'आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज'