मुंबई - राज्यात पुरस्थिती व अतिवृष्टीमुळे एकूण ११२ जणांचे मृत्यू झाले आहेत. तर १,३५,३१३ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ही माहिती मदत व पुनर्वसन विभागाने शनिवारी रात्री साडेनऊ वाजता दिली आहे.
मदत व पुनर्वसन विभागाच्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३, २२१ जनावरांचे मृत्यू झाले आहेत. एकंदर ५३ लोक जखमी आहेत. तर ९९ लोक बेपत्ता आहेत.
हेही वाचा-तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचे पुनर्वसन करू - मुख्यमंत्री
कोकण विभागाला पावसाचा मोठा फटका
गेल्या ३ दिवसांपासून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाने जोरदार तडाखा दिला. कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे हे नऊ जिल्हे पाण्याखाली गेले. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून होत्याचे नव्हते झाले. रायगड जिल्ह्यात तीन ठिकाणी दरड कोसळली. लोकांची घरदार, गुरेढोरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
हेही वाचा-महाडच्या दुर्घटनाग्रस्त तळीये गावचा म्हाडा करणार पुनर्विकास -जितेंद्र आव्हाड
- सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने सातारा जिल्ह्यात मोठी जीवीत आणि अर्थिक हानी झाली आहे. याचा सर्वाधिक फटका पाटण तालुक्याला बसला आहे. भूस्खलन होऊन तीन गावांतील 21 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 8 जण अद्याप बेपत्ता आहेत. एनडीआरएफची टीम बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला आहे. अशा स्थितीत भुस्खलनच्या घटना घडत आहेत. गगनबावडा तालुक्यातील अणदूर -धुंदवडे हा १५ फुटांचा रस्ता खचला आहे. रस्ता खचल्याने आजूबाजूच्या पंधरा-वीस गावांचा संपर्क तुटला आहे. कडवे, गुरववाडी, शेळोशी भागात भूस्खलनच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.
- चिपळूणमध्ये महापुराने व्यापाऱ्यांची किती दाणादाण उडवून दिलेली आहे, ती पुरानंतरची दृश्य बघितल्यावर लक्षात येते. या पुराने व्यापाऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. लाखो-करोडोंचे नुकसान या पुराने झालेले आहे.
वारणा व कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पाऊसाची उघडीप
जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला आहे. मात्र सकाळपासून जिल्ह्यात आणि वारणा व कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पाऊसाने उघडीप दिला आहे. तर कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे.