मुंबई - उच्च न्यायालयातील वकिलांसाठी खास लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात 1 हजार लसी उपलब्ध करून देण्याची मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडून कबूली देण्यात आली आहे. पुढील आठवड्यातला एक दिवस या विशेष लसीकरणासाठी राखीव ठेवण्यास मुख्य न्यायमूर्तींनी सुध्दा परवानगी दिली आहे.
कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी राबवण्यात आली एक विशेष लसीकरण मोहीम
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती शिंदे आणि बॉम्बे बार असोसिएशनसह इतर वकिल संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहलही ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. पुढील आठवड्यात हायकोर्टात ही विशेष मोहीम राबवण्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचारी वर्गासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. ज्यात एकूण 2100 जणांना लस देण्यात आली. त्यानंतर आता हायकोर्टात वकिली करणाऱ्या वकिलांसाठी लसीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत वकिलांची संख्या काही हजारोमध्ये आहे, हे पाहता लसीकरण त्यावर एकच उपाय दिसत आहे.
1 हजार लस साठा उपलब्ध करून देऊ शकतो
सध्या सार्वजनिक प्रवासावर निर्बंध असल्याने हायकोर्टापर्यंत लसीकरणासाठी नेमके किती वकील येऊ इच्छित आहेत?, याची चाचपणी सुरू आहे. त्यासाठी गुगलवर सर्व सभासदांना एक फॉर्म पाठवून आपली उपलब्धता तातडीने कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र सरसकट सर्व वकिलांना देता येईल, इतका लसींचा साठा उपलब्ध नसल्याचे पालिका आयुक्तांनी या बैठकीत स्पष्ट केले आहे. या चर्चेअंती 1 हजार लस साठा उपलब्ध करून देऊ शकतो, अशी हमी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हायकोर्टाला दिली.
हेही वाचा - समाधान अवताडे यांनी घेतली आमदारकीची शपथ