मुंबई - देशातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला नॅककडून 'अ++' श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडेकडून (नॅक) मुंबई विद्यापीठास ३.६५ सीजीपीए गुणांकन देण्यात आले आहे. नॅककडून सर्वाधिक गुण मिळवणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.
राज्यातील पहिले विद्यापीठ -
मागील साडेचार वर्षांपासून नॅकची श्रेणी मिळवण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मुंबई विद्यापीठाचे मूल्यांकन नुकतेच पूर्ण झाले आहे. विद्यापीठाला नॅकचा अ++ श्रेणीचा दर्जा मिळाला आला आहे. महाराष्ट्र राज्यात नॅकच्या श्रेणीत सर्वाधिक गुण मिळवण्यामध्ये मुंबई विद्यापीठ हे प्रथम क्रमांकावर आहे. राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून (नॅक) विद्यापीठाच्या मूल्यांकनाची मुदत 20 एप्रिल 2017 रोजी संपली होती. गेली दोन वर्ष लॉकडाऊनमुळे ही प्रकिया पूर्ण होऊ शकली नव्हती. 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत समितीने पाहणी केल्यानंतर आता अधिकृत घोषणा झाली. नॅकच्या मूल्यांकनाच्या निष्कर्षानुसार विद्यापीठ राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत अव्वल ठरले आहे. सर्वोत्तम 3.65 गुण मुंबई विद्यापीठाने मिळवले असून A++ श्रेणीचा दर्जा आपल्या नावाने नोंदविला आहे.
ऐतिहासिक क्षण -
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले की, अग्रगण्य विद्यापीठ म्हणून समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाला नॅककडून अ++ ची श्रेणीसह सर्वोत्कृष्ट मानांकन प्राप्त होणे हे अत्यंत अभिमानस्पद आणि अभिनंदनीय बाब आहे. विद्यापीठाच्या १६४ वर्षांच्या वाटचालीतील हा एक ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे. ज्ञानदानाची उज्वल आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या विद्यापीठाला मिळालेल्या या सर्वोत्तम श्रेणीचा फायदा विद्यार्थी आणि विद्यापीठासह सर्वच भागधारकांना नक्कीच होईल. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्वांचे विशेष आभार त्यांनी व्यक्त केले.